नर्मदा-शोण-जोहिल्ला

पुण्य आले की पापही आले… पूजा आली की निर्भत्सना आली… पावित्र्य आले की विटाळ आला… देवी आली की देवी नसलेल्या, कम-देवी आल्या.

भारतात नद्या देव्याच आहेत असे नाहीत…काही नुसत्या ‘नद्या’ आहेत..काही त्याहून कमी आहेत. कर्मनाशा, किर्तीनाशा, फाल्गु..

आणि माझी आवडती जोहिल्ला.

नर्मदा खोर्याबद्दल वाचताना ही नदी, तिच्या नावातला तो नाद खूप आवडला होता. नर्मदा, शोण किंवा सोनभद्र आणि जोहिल्ला यांचा उगम तसा एकमेकांच्या जवळचा. अमरकंटक biosphere reserve मधला. नर्मदा मैकाल पर्वताची लेक. राजकन्या. मैकालला नर्मदेचे लग्न देखण्या सोनभद्र बरोबर करायचे होते. नर्मदेला एकदा सोनभद्रला बघायचे होते. तिने आपली दासी आणि सखी जोहिल्ला हिला आपले जरतारी कपडे नेसवले आणि सांगितले जा, बघ तर शोण कसा आहे तो. जोहिल्ला गेली.

पण अगदी Bollywood मध्ये होते तसेच झाले. शोणला वाटले हीच नर्मदा. काही कथा म्हणतात त्याने तिच्याशी लग्न केले, काही म्हणतात त्याने फक्त तिचा हात हातात घेतला, काही म्हणतात ते हसून बोलले. काहीही असो.

नर्मदेने हे बघितले व एका क्षणात सगळे पाश तोडून ती पश्चिमेकडे धावली.

शोणला आपली चूक उमगली. आपण जिचा हात धरला ती काही वैभवशाली राजकन्या नाही, यःकश्चित दासी आहे ती..
त्याने नर्मदेला बोलावले, पण ती स्वाभिमानी नदी काही परत फिरली नाही.
विषण्ण होवून शोण पूर्वेला निघून गेला..गंगेत विलीन झाला आणि बंगालच्या उपसागराकडे गेला..
नर्मदेने आपले स्वतःचे खोरे बनविले आणि अरबी समुद्रास मिळाली…कुमारिका राहिली.

पण जोहिल्लेचे काय झाले? तिची काही चूक नव्हती.. तिने शोणला होकार दिला की नाही हे देखील माहित नाही.
पण जोहिल्लेची पूजा होत नाही. तिचे पाणी पवित्र नाही मानले जात.
ती फक्त शोण आणि नर्मदेच्या मधली गैरसोय.

अशी ही जोहिल्ला.

~परिणीता 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s