सिंधू आणि मस्त कलंदर!

कोण होता हा लाल शाहबाझ कलंदर? पाकिस्तानात त्याच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकला माथेफिरू ISIS ने..८० लोक मेले..सगळीकडे होतेच आहे हे…कशाला वाईट वाटून घ्यायचे… परवाच तू सीरियाचे सांगितलेस..Aleppo बघायचे होते ना.. आता उत्खननात सापडल्यासारखे झाले.. चालायचेच. शहरं संपतात… संस्कृती संपतात… कारण नसताना युद्ध होतात…सृष्टी-स्थिती-लय.

मग शाहबाझ कलंदरच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकण्याचे कशाला मनाला लाऊन घायचे? कोण हा? काय संबंध त्याचा-माझा?

पण कसंय ना..जगातल्या कमी जागा बघायच्या होत्या…सेहवान शरीफ त्यातली एक… कधीतरी सिंधला जाणार…सिंधू बघणार… झुलेलालचे नदीतले घर बघणार…आपल्या मुर्शिदला भेटायला येणारे हिल्सा मासे बघणार…मग नदीतीराने सेहवान गाठणार…शाहबाझ कलंदरची न संपणारी धम्माल बघणार…कोणजाणे त्या मानवापलीकडे गेलेल्या बायकांमध्ये …त्या वेड्या फकीरांमध्ये, दर्वेश्यांमध्ये, भिकार्यांमध्ये…काहीतरी ओळखीचे दिसेल..त्यांच्या बरोबर एखादी गिरकी मी पण घेईन..

हा कधीतरी इराण मधून सिंधू किनारी आला 12व्या शतकात…कवी, गायक, संगीतकार, संत..आणि मग इथलाच झाला.. जसे सिंधूच्या तीरावर अनेक पाणवठे आहेत, हिरवे ओयासिस आहेत तशाच याच्या गोष्टी. धुरकट भकास वाळवंटात जिथेजिथे हिरवा रंग आहे तिथेतिथे कलंदरचा स्पर्श आणि त्याच्या गोष्टी आहेत. धर्माच्या पलीकडचा हा.

शिया जागा म्हणून सेहवानवर बॉम्ब टाकला म्हणे.. अर्रे, तो तर हिंदू-मुसलमानांच्या पलिकडचा.. दर्यापंथी हिंदू त्याला राजा भ्रतहरी मानतात…काही नवनाथांचा अवतार म्हणतात..काही झुलेलाल म्हणतात, काही झिन्दापीर म्हणतात..काही सुफी संत आणि कलंदर पंथाचा प्रमुख म्हणतात..

नाडलेल्या, झिडकारलेल्या, विचित्र Weirdos चा देव, असे देव मुळात कमी. जोवर लोक आहेत तोवर लाल शाहबाझ कलंदर आहे…अबिदाच्या गाण्यात आहे, बुल्लेह शाहच्या, सचल सरमस्तच्या शब्दात आहे, सिंधूच्या वेड्यावाकड्या, कोरड्या-खाऱ्या पाण्यात आहे, धरणामागे अडकलेल्या हिल्सा माशात आहे. बॉम्बने काय होणार…

Hilsa.jpg
सिंधूचे मोहना मासेमार आणि हिल्सा फोटो: The Dawn

सिंधू नदीला आपल्या तालावर नाचवणारा संत.. त्याच्या धम्मालमध्ये कोण नाचत माहितीये..नुसते देश परदेशातले वेडे फकीर नाहीत, तर बायका, तृतीयपंथी , ओळख विसरलेले, ओळख नसणारे, जग नको असणारे…

याचे सेहवान “सेहवान शरीफ” होण्याआधी शिविस्थान होते..मोरोक्कोच्या इब्न बटूटाने याचा उल्लेख केला आपल्या बखरीत केला… पर्शिया आणि भारतामधले सिंधू नदीतीरावरचे महत्वाचे ट्रेड रूट… अशा ठिकाणी कट्टर धर्म टिकत नाही. अनेकानेक लोकांच्या घामात,चलाखीत, हसण्यात, रडण्यात, प्रेमात, व्यवहारात, कलेत कट्टरतेचा रंग उडत जातो…मुंबईत होते तसेच….

संध्याकाळ कलली की सेहवान शरीफ दर्ग्यात लोक घुमू लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात, धम्माल चढत जाते, भिनत जाते रक्तात. .. सईद, पीर, फकीर, मजहूब, सगळे एक होतात. हजीरी येतात..फकिरी येतात..संसारात बुडलेली बाई आपला बुरखा फेकून फकिरी होवून जीवघेण्या गिरक्या घेते निळ्या फरशीवर..

‘लाल की मस्तानी’ केस मोकळे सोडून गोलगोलगोलगोलगोल फिरते… म्हणते माझे संसारिक आयुष्य माझ्या मुर्शिदने मला दिलेली “आझ्माइश” आहे…सकाळी ती परत कपडे बदलून घरी जाते.. उरुसात मेंदीने भरलेली ताटे जातात हिंदूकडून मुसलमानाकडे-शिया कडून सुन्नी कडे, बाईकडून तृतीयपंथीयाकडे..न संपणारे आहे हे..उरूस  म्हणजे काय माहितीये…नुसते मातम नाही… मिलन! प्रभुशी एकरूप होणे! लग्नच!

कलंदरच्या लाल रंगात सिंधू नदी आहे संचारलेली…याला कोण बॉम्बने शांत करणार..

लाली मेरे लाल कि, जित देखू उत लाल.
लाल देखण मै गई, मै भी हो गई लाल..

चार चिराग तेरे बलन हमेशा
पंजवा बालन आइया बला झूलेलालन,
सिंधड़ी दा, सेहवन दा सखी शाहबाझ कलंदर!
दमा दम मस्त कलंदर!!

~परिणीता