पार चना दे..
कच्ची मेरी मिट्टी, कच्चा मेरा नाम नी,
कच्चीयाना होणा है कच्चा अंजाम नी..
कच्चीये ते रक्खीये ना उम्मीद पार दी..
घड़िया, घड़िया, आवे घड़िया
सुर-सोहनी हे सिंध मधील शाह अब्दुल लतीफ भिताई या विलक्षण कवी, संत, किमयागार, सुफी गायक यांच्या कथेवर रचलेले काव्य…मुरलेल्या लोककथेसारखे कोणी म्हणतात हे खरे होते, घडले होते.. सोहनी खरंच चिनाब नदीत बुडली..तिची गाणी खरंच तिनेच गायली होती..
किंवा त्या आधीचीही असेल… गोष्ट महत्वाची, सांगणारे बदलत जातात..
मेहेरला भेटायला जाताना सोहनीला चिनाब नदी ओलांडावी लागायची. ती तर कुंभार, सुंदर माठ घडवायची, त्यातलाच एक घडा उराशी धरून ती पल्याड जायची. एकदा तिच्या नणंदेने हे बघितले आणि हळूच तिच्या नेहमीच्या घड्याच्या जागी कच्चा घडा ठेवला.
सोहनी वादळी रात्री नदीत उतरली आणि अर्ध्यात आल्यावर तिला कळले की घडा विरघळतोय…नदीतील मगरी तिचा पाय धरत आहेत..पाणी नाका-तोंडात जात आहे.. आणि विश्वासू घडा काही साथ देत नाही.
अनेक कथांची, गाण्यांची, चित्रांची सुरुवातच या जादुई प्रसंगाने होते, ज्यात सोहनी आणि मेहेर दोघे घड्याला विनवत आहेत ..आणि घडा हतबलतेने म्हणत आहे, “मी नाही तुला पार घेऊन जाऊ शकत सोहनी…आपण दोघेही विरघळणार आहोत…”

मला ‘कशी काळ नागिणी, सखे गं वैरीण झाली नदी” हे गाणे ऐकून नेहमी क्षणा-क्षणाला विरघळत जाणारा घडा गच्च धरून नदी पार करणारी सोहनीच आठवते 😦 “प्राणांचे घे मोल नाविका, लावी पार, ने आधि”…
सिंधू आणि चिनाब तीरी अनेक सुफी मशिदी आहेत, जुन्या, भग्न. तिथे भरजरी रंगांनी सोहनीची चित्रे आणि तिची गोष्ट रंगवलेली आहे. आणि सिंध मधील शेतकरी, मासेमार अजूनही सूर-सोहनी गुणगुणतात.
चिनाब जेव्हा भारतातून पाकिस्तानात जाते तेव्हा तिचे नुसते पात्र रुंदावत नाही, तिच्या भटकभवान्या धारांमध्ये अनेक गोष्टी गुंफल्या जातात. या गोष्टी चिनाब भोवतीच का रचल्या गेल्या? वारीस शाहच जाणे 🙂
अनेकांनी अनेक रंगात सांगितलेली सोहनीची गोष्ट , तिची गीते, तिच्या कविता म्हणजेच आजची चिनाब. चिवट होती ती. “कच्चे घडने जीत ली नदी चढी हुई, जहां मजबूत कश्तीयो को किनारा नहीं मिला”..
रांझाने चिनाबच्या तीरावर आपली बासरी वाजवली, हीर त्याला चिनाबतीरीच दिसली. मिरजा-साहिबां इथलेच. सस्सी-पन्नू मधल्या सस्सीला लहानपणी चिनाबमधे सोडले होते.
गम्मत म्हणजे, चिनाब म्हजे जशी चंद्र-नदी (चेन-आब), तशी ती भारतात चंद्र-भागा. चंद्रा ही चंद्राची मुलगी आणि भागा सूर्याचा मुलगा.
थोडक्यात काय, चिनाब असो, पृथ्वी असो, अनेक गोष्टी या शाहण्या म्हाताऱ्यानी बघितल्या आहेत. शब्द बदलत जातात, चेहरे बदलतात. पण गोष्ट तीच…खूप जुनी.
Every great story is the same story.
~~ परिणीता