चिनाब, सिंधू, सोहनी

पार चना दे..

कच्ची मेरी मिट्टी, कच्चा मेरा नाम नी,

कच्चीयाना होणा है कच्चा अंजाम नी..

कच्चीये ते रक्खीये ना उम्मीद पार दी..

घड़िया, घड़िया, आवे घड़िया

सुर-सोहनी हे सिंध मधील शाह अब्दुल लतीफ भिताई या विलक्षण कवी, संत, किमयागार, सुफी गायक यांच्या कथेवर रचलेले काव्य…मुरलेल्या लोककथेसारखे कोणी म्हणतात हे खरे होते, घडले होते.. सोहनी खरंच चिनाब नदीत बुडली..तिची गाणी खरंच तिनेच गायली होती..

किंवा त्या आधीचीही असेल… गोष्ट महत्वाची, सांगणारे बदलत जातात..

मेहेरला भेटायला जाताना सोहनीला चिनाब नदी ओलांडावी लागायची. ती तर कुंभार, सुंदर माठ घडवायची, त्यातलाच एक घडा उराशी धरून ती पल्याड जायची. एकदा तिच्या नणंदेने हे बघितले आणि हळूच तिच्या नेहमीच्या घड्याच्या जागी कच्चा घडा ठेवला.

सोहनी वादळी रात्री नदीत उतरली आणि अर्ध्यात आल्यावर तिला कळले की घडा विरघळतोय…नदीतील मगरी तिचा पाय धरत आहेत..पाणी नाका-तोंडात जात आहे.. आणि विश्वासू घडा काही साथ देत नाही.

अनेक कथांची, गाण्यांची, चित्रांची सुरुवातच या जादुई प्रसंगाने होते, ज्यात सोहनी आणि मेहेर दोघे घड्याला विनवत आहेत ..आणि घडा हतबलतेने म्हणत आहे, “मी नाही तुला पार घेऊन जाऊ शकत सोहनी…आपण दोघेही विरघळणार आहोत…”

18 Century miniature depicting Sohni, Mahiwal and Chenab Wikimedia Commons
18 Century miniature depicting Sohni, Mahiwal and Chenab Wikimedia Commons

मला ‘कशी काळ नागिणी, सखे गं वैरीण झाली नदी” हे गाणे ऐकून नेहमी क्षणा-क्षणाला विरघळत जाणारा घडा गच्च धरून नदी पार करणारी सोहनीच आठवते 😦 “प्राणांचे घे मोल नाविका, लावी पार, ने आधि”…

सिंधू आणि चिनाब तीरी अनेक सुफी मशिदी आहेत, जुन्या, भग्न. तिथे भरजरी रंगांनी सोहनीची चित्रे आणि तिची गोष्ट रंगवलेली आहे. आणि सिंध मधील शेतकरी, मासेमार अजूनही सूर-सोहनी गुणगुणतात.

चिनाब जेव्हा भारतातून पाकिस्तानात जाते तेव्हा तिचे नुसते पात्र रुंदावत नाही, तिच्या भटकभवान्या धारांमध्ये अनेक गोष्टी गुंफल्या जातात. या गोष्टी चिनाब भोवतीच का रचल्या गेल्या? वारीस शाहच जाणे 🙂

अनेकांनी अनेक रंगात सांगितलेली सोहनीची गोष्ट , तिची गीते, तिच्या कविता म्हणजेच आजची चिनाब. चिवट होती ती. “कच्चे घडने जीत ली नदी चढी हुई, जहां मजबूत कश्तीयो को किनारा नहीं मिला”..

रांझाने चिनाबच्या तीरावर आपली बासरी वाजवली, हीर त्याला चिनाबतीरीच दिसली. मिरजा-साहिबां इथलेच. सस्सी-पन्नू मधल्या सस्सीला लहानपणी चिनाबमधे सोडले होते.

गम्मत म्हणजे, चिनाब म्हजे जशी चंद्र-नदी (चेन-आब), तशी ती भारतात चंद्र-भागा. चंद्रा ही चंद्राची मुलगी आणि भागा सूर्याचा मुलगा.

थोडक्यात काय, चिनाब असो, पृथ्वी असो, अनेक गोष्टी या शाहण्या म्हाताऱ्यानी बघितल्या आहेत. शब्द बदलत जातात, चेहरे बदलतात. पण गोष्ट तीच…खूप जुनी.

Every great story is the same story.

~~ परिणीता

सिंधू आणि मस्त कलंदर!

कोण होता हा लाल शाहबाझ कलंदर? पाकिस्तानात त्याच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकला माथेफिरू ISIS ने..८० लोक मेले..सगळीकडे होतेच आहे हे…कशाला वाईट वाटून घ्यायचे… परवाच तू सीरियाचे सांगितलेस..Aleppo बघायचे होते ना.. आता उत्खननात सापडल्यासारखे झाले.. चालायचेच. शहरं संपतात… संस्कृती संपतात… कारण नसताना युद्ध होतात…सृष्टी-स्थिती-लय.

मग शाहबाझ कलंदरच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकण्याचे कशाला मनाला लाऊन घायचे? कोण हा? काय संबंध त्याचा-माझा?

पण कसंय ना..जगातल्या कमी जागा बघायच्या होत्या…सेहवान शरीफ त्यातली एक… कधीतरी सिंधला जाणार…सिंधू बघणार… झुलेलालचे नदीतले घर बघणार…आपल्या मुर्शिदला भेटायला येणारे हिल्सा मासे बघणार…मग नदीतीराने सेहवान गाठणार…शाहबाझ कलंदरची न संपणारी धम्माल बघणार…कोणजाणे त्या मानवापलीकडे गेलेल्या बायकांमध्ये …त्या वेड्या फकीरांमध्ये, दर्वेश्यांमध्ये, भिकार्यांमध्ये…काहीतरी ओळखीचे दिसेल..त्यांच्या बरोबर एखादी गिरकी मी पण घेईन..

हा कधीतरी इराण मधून सिंधू किनारी आला 12व्या शतकात…कवी, गायक, संगीतकार, संत..आणि मग इथलाच झाला.. जसे सिंधूच्या तीरावर अनेक पाणवठे आहेत, हिरवे ओयासिस आहेत तशाच याच्या गोष्टी. धुरकट भकास वाळवंटात जिथेजिथे हिरवा रंग आहे तिथेतिथे कलंदरचा स्पर्श आणि त्याच्या गोष्टी आहेत. धर्माच्या पलीकडचा हा.

शिया जागा म्हणून सेहवानवर बॉम्ब टाकला म्हणे.. अर्रे, तो तर हिंदू-मुसलमानांच्या पलिकडचा.. दर्यापंथी हिंदू त्याला राजा भ्रतहरी मानतात…काही नवनाथांचा अवतार म्हणतात..काही झुलेलाल म्हणतात, काही झिन्दापीर म्हणतात..काही सुफी संत आणि कलंदर पंथाचा प्रमुख म्हणतात..

नाडलेल्या, झिडकारलेल्या, विचित्र Weirdos चा देव, असे देव मुळात कमी. जोवर लोक आहेत तोवर लाल शाहबाझ कलंदर आहे…अबिदाच्या गाण्यात आहे, बुल्लेह शाहच्या, सचल सरमस्तच्या शब्दात आहे, सिंधूच्या वेड्यावाकड्या, कोरड्या-खाऱ्या पाण्यात आहे, धरणामागे अडकलेल्या हिल्सा माशात आहे. बॉम्बने काय होणार…

Hilsa.jpg
सिंधूचे मोहना मासेमार आणि हिल्सा फोटो: The Dawn

सिंधू नदीला आपल्या तालावर नाचवणारा संत.. त्याच्या धम्मालमध्ये कोण नाचत माहितीये..नुसते देश परदेशातले वेडे फकीर नाहीत, तर बायका, तृतीयपंथी , ओळख विसरलेले, ओळख नसणारे, जग नको असणारे…

याचे सेहवान “सेहवान शरीफ” होण्याआधी शिविस्थान होते..मोरोक्कोच्या इब्न बटूटाने याचा उल्लेख केला आपल्या बखरीत केला… पर्शिया आणि भारतामधले सिंधू नदीतीरावरचे महत्वाचे ट्रेड रूट… अशा ठिकाणी कट्टर धर्म टिकत नाही. अनेकानेक लोकांच्या घामात,चलाखीत, हसण्यात, रडण्यात, प्रेमात, व्यवहारात, कलेत कट्टरतेचा रंग उडत जातो…मुंबईत होते तसेच….

संध्याकाळ कलली की सेहवान शरीफ दर्ग्यात लोक घुमू लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात, धम्माल चढत जाते, भिनत जाते रक्तात. .. सईद, पीर, फकीर, मजहूब, सगळे एक होतात. हजीरी येतात..फकिरी येतात..संसारात बुडलेली बाई आपला बुरखा फेकून फकिरी होवून जीवघेण्या गिरक्या घेते निळ्या फरशीवर..

‘लाल की मस्तानी’ केस मोकळे सोडून गोलगोलगोलगोलगोल फिरते… म्हणते माझे संसारिक आयुष्य माझ्या मुर्शिदने मला दिलेली “आझ्माइश” आहे…सकाळी ती परत कपडे बदलून घरी जाते.. उरुसात मेंदीने भरलेली ताटे जातात हिंदूकडून मुसलमानाकडे-शिया कडून सुन्नी कडे, बाईकडून तृतीयपंथीयाकडे..न संपणारे आहे हे..उरूस  म्हणजे काय माहितीये…नुसते मातम नाही… मिलन! प्रभुशी एकरूप होणे! लग्नच!

कलंदरच्या लाल रंगात सिंधू नदी आहे संचारलेली…याला कोण बॉम्बने शांत करणार..

लाली मेरे लाल कि, जित देखू उत लाल.
लाल देखण मै गई, मै भी हो गई लाल..

चार चिराग तेरे बलन हमेशा
पंजवा बालन आइया बला झूलेलालन,
सिंधड़ी दा, सेहवन दा सखी शाहबाझ कलंदर!
दमा दम मस्त कलंदर!!

~परिणीता

शहरं

सोकी बंदर नावाचे छोटे बेट आहे सिंधू नदीच्या मुखाजवळ. आपल्या मुंबईसारखे. काही दशकांपूर्वी दृष्ट लागेल असे समृद्ध…तलम कापड आणि मग्रूर व्यापारी यांनी भरलेले. हळूहळू समुद्र आत आला आणि सिंधू मागे पडत गेली. सोकी बंदर आज एक वठलेले, मिठाने भरलेले गाव आहे… इतके गरीब की आरशासारखे लख्ख. कचरा नाहीच.

गोमती नदी, अंह, द्वारकेची गोमती, गंगेची उपनदी नाही, अरेबिअन समुद्रात आत आत शिरत असे. Archaeological evidence असे सांगतो की १४०० BC पासून इथे अनेक समृद्ध शहरे वसली. त्यांनी समुद्राला रोखून धरायचे खूप प्रयत्न केले. भिंती बांधल्या, गोमतीला बांधून घालायचा प्रयास केला… पण प्रत्येक द्वारका बुडलीच.

आज देखील गोमती नदीचे १.५ किमी पात्र समुद्राच्या आत सापडते. आणखी काय काय सापडते तिथे माहितीये….दगडी भिंती, दगडी anchor, मोती, हरप्पन काळातील Lustrous Red Ware Pottery. अनेक संस्कृतींचे अवशेष…पण आपण अडकलोय फक्त कृष्णाच्या गोष्टीत..

Related image
समुद्रातील दगडी Anchor Photo: National Institute of Oceanography

तशीच Cleopatra आणि Julius Caeser यांची Alexandria…Cleopatraचा अख्खा राजवाडा गिळला पाण्याने…आपण सगळे विसरलो होतो त्याला, पण चिरतरुण Cleopatraच्या गोष्टी संपल्या नाहीत. काही वर्षापूर्वी समुद्रात उत्खनन झाले आणि काही लाजणारे, भग्न अवशेष दोरखंडांनी हवेत आले. (त्यांना आतच बरे वाटत असेल कदाचित)

आणि नाईल नदीच्या मुखाशी, delta मधे होते वैभवशाली Heracleion..Egypt चे सर्वात संपन्न बंदर… पण तुला Heracleion ची खरी गम्मत माहितीये..इथे Helen of Troy आणि Paris भेटले होते. तेच दोघे ज्यांना भेटता क्षणी कळले की आपल्या भेटीने मंथन होणार..

Image result for Heracleion
Heracleion चे अवशेष   फोटो: Atlasobscura.com

या शहराचे नाव पडले Heracles या ग्रीक देवावरून. कोण होता हा माहितीये? Alcmene आणि देवांचा देव Zeus यांचा मुलगा. यांची गोष्ट अगदी तुझ्या अहिल्ये सारखी… Zeus देखील एकदा Alcmene च्या नवऱ्याचे: Amphitryon चे रूप घेऊन आला. पण त्यांच्या मुलाला ग्रीसने देव केले… ना Alcmene अहिल्येसारखी शिळा झाली, ना Zeus शापित झाला. असो.

तर हे Heracleion 1200 वर्षा पूर्वी Mediterranean समुद्रात बुडाले. नाईल कमी पडली. ज्याला बंदरांचा राजा, इजिप्तचे अविभाज्य अंग वगैरे म्हटले होते त्याला लोक पुरते विसरून गेले! राहिले काय तर Helen of Troy आणि Paris च्या गोष्टी.

शहरे चिरंतन नसतात. गोष्टी चिरंतन असतात. शहरे विसरली जातात…कितीही संपन्न, श्रीमंत, सुंदर असली तरीही. वेड्यांच्या गोष्टी मागे राहतात. त्याच गोष्टी कधी मग या झोपलेल्या शहरांना नदीच्या, समुद्राच्या कुशीतून उठवतात.

शहरे वृद्ध, थकलेली: गोष्टी तरुण, सदा नव्या. प्रत्येक सांगणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे वय स्वतःच ढापणाऱ्या!

म्हणून मला ती बाग खूप आवडते. तिथे लगबग चालणारे लोक, व्यायाम करणारी गमतीशीर माणसे, भंकस करणारे तरुण तरुणी, नारळाची झाडे, जवळच असणारे mangroves, त्या शेजारची बिट्टी नदी, तिच्या पलीकडचा समुद्र.. हे सगळेच. उद्या, परवा, हजार वर्षानंतर समुद्राने बागेला अगदी गिळले तरी हरकत नाही. बाग आणि तिच्या गोष्टी माझ्यासाठी चिरंतन आहेत.

बाकी नदी आणि समुद्राची भरती ओहोटी सुरूच राहणार की.

~परिणीता

नावं

Above: खलघाट येथील नर्मदा फोटो: परिणीता

मुझे जाँ न कहो मेरी जाँ, मेरी जाँ..
जाँ न कहो अंजान मुझे,
जान कहाँ रहती है सदा..

संजीव कुमार काय सही होता ना यात.. आणि गीता दत्त..तिच्यासाठीच होत हे गाणं.. actually you know what जान वगैरे राहू दे, एका नदीचे नावपण एक राहत नाहीत..बदलत जातं..

दगडांवरून खळखळ उड्या मारते ती ‘रेवा’,
गंभीर, घरंदाज, मागे न वळणारी ती ‘नर्मदा’.

जिला बांधता येत नाही ती ‘गंगा’.
खाली मान घालून सगळ्यांचं सगळं ऐकते ती ‘जान्हवी’…
परदेशी जाते तेव्हा सुलक्षणी ‘पद्मा’..
समुद्रात विलीन होताना ढगांकडे बघणारी ‘मेघना’.

आपल्या पुस्तकी fantasy साठी ‘सिंधू’,
सिंधच्या लोकांना पुरांनी हैराण करते ती ‘पुराली’,
अफगाण्यांना जबाबदार वडील वाटते तेव्हा ‘अब्बासिन’,
कधी आकाशाचा तुकडा चोरते तेव्हा ‘निलाब’

तापत-तळपत, विदर्भ-खानदेशातून जाते ती ‘तापी’,
डोकं उशाशी घेऊन आश्वस्त करते ती ‘अर्कजा’.

शक्तीस्वरूप वाहते ती ‘भीमा’,
विठ्ठलाच्या पायी उगीच रेंगाळते ती ‘चंद्रभागा’.

गंगेची १००० नावे, नर्मदेची १०००, तापीची २१.

सांगायचं काय (अरे किती बोलते ही :D) की खूप नावं पाहिजेत…अगदी खूप. एका माणसाला एकच नाव जन्मभर कसं पुरणार? किती माणसं असतात एकात. गर्दी असते. रात्री लिहिणारी वेगळी. सकाळी वाचणारी वेगळी. भंकस करणारी माणसं वेगळी, फिलोसोफीवाली वेगळी. चर्चसमोर पाणीपुरी खाणारी वेगळी, डॉक्टर बनणारी वेगळी.

तुला लहानपणी एकच नाव होते हे मला म्हणून आवडत नाही.

~परिणीता