नर्मदा-शोण-जोहिल्ला

पुण्य आले की पापही आले… पूजा आली की निर्भत्सना आली… पावित्र्य आले की विटाळ आला… देवी आली की देवी नसलेल्या, कम-देवी आल्या.

भारतात नद्या देव्याच आहेत असे नाहीत…काही नुसत्या ‘नद्या’ आहेत..काही त्याहून कमी आहेत. कर्मनाशा, किर्तीनाशा, फाल्गु..

आणि माझी आवडती जोहिल्ला.

नर्मदा खोर्याबद्दल वाचताना ही नदी, तिच्या नावातला तो नाद खूप आवडला होता. नर्मदा, शोण किंवा सोनभद्र आणि जोहिल्ला यांचा उगम तसा एकमेकांच्या जवळचा. अमरकंटक biosphere reserve मधला. नर्मदा मैकाल पर्वताची लेक. राजकन्या. मैकालला नर्मदेचे लग्न देखण्या सोनभद्र बरोबर करायचे होते. नर्मदेला एकदा सोनभद्रला बघायचे होते. तिने आपली दासी आणि सखी जोहिल्ला हिला आपले जरतारी कपडे नेसवले आणि सांगितले जा, बघ तर शोण कसा आहे तो. जोहिल्ला गेली.

पण अगदी Bollywood मध्ये होते तसेच झाले. शोणला वाटले हीच नर्मदा. काही कथा म्हणतात त्याने तिच्याशी लग्न केले, काही म्हणतात त्याने फक्त तिचा हात हातात घेतला, काही म्हणतात ते हसून बोलले. काहीही असो.

नर्मदेने हे बघितले व एका क्षणात सगळे पाश तोडून ती पश्चिमेकडे धावली.

शोणला आपली चूक उमगली. आपण जिचा हात धरला ती काही वैभवशाली राजकन्या नाही, यःकश्चित दासी आहे ती..
त्याने नर्मदेला बोलावले, पण ती स्वाभिमानी नदी काही परत फिरली नाही.
विषण्ण होवून शोण पूर्वेला निघून गेला..गंगेत विलीन झाला आणि बंगालच्या उपसागराकडे गेला..
नर्मदेने आपले स्वतःचे खोरे बनविले आणि अरबी समुद्रास मिळाली…कुमारिका राहिली.

पण जोहिल्लेचे काय झाले? तिची काही चूक नव्हती.. तिने शोणला होकार दिला की नाही हे देखील माहित नाही.
पण जोहिल्लेची पूजा होत नाही. तिचे पाणी पवित्र नाही मानले जात.
ती फक्त शोण आणि नर्मदेच्या मधली गैरसोय.

अशी ही जोहिल्ला.

~परिणीता 

नावं

Above: खलघाट येथील नर्मदा फोटो: परिणीता

मुझे जाँ न कहो मेरी जाँ, मेरी जाँ..
जाँ न कहो अंजान मुझे,
जान कहाँ रहती है सदा..

संजीव कुमार काय सही होता ना यात.. आणि गीता दत्त..तिच्यासाठीच होत हे गाणं.. actually you know what जान वगैरे राहू दे, एका नदीचे नावपण एक राहत नाहीत..बदलत जातं..

दगडांवरून खळखळ उड्या मारते ती ‘रेवा’,
गंभीर, घरंदाज, मागे न वळणारी ती ‘नर्मदा’.

जिला बांधता येत नाही ती ‘गंगा’.
खाली मान घालून सगळ्यांचं सगळं ऐकते ती ‘जान्हवी’…
परदेशी जाते तेव्हा सुलक्षणी ‘पद्मा’..
समुद्रात विलीन होताना ढगांकडे बघणारी ‘मेघना’.

आपल्या पुस्तकी fantasy साठी ‘सिंधू’,
सिंधच्या लोकांना पुरांनी हैराण करते ती ‘पुराली’,
अफगाण्यांना जबाबदार वडील वाटते तेव्हा ‘अब्बासिन’,
कधी आकाशाचा तुकडा चोरते तेव्हा ‘निलाब’

तापत-तळपत, विदर्भ-खानदेशातून जाते ती ‘तापी’,
डोकं उशाशी घेऊन आश्वस्त करते ती ‘अर्कजा’.

शक्तीस्वरूप वाहते ती ‘भीमा’,
विठ्ठलाच्या पायी उगीच रेंगाळते ती ‘चंद्रभागा’.

गंगेची १००० नावे, नर्मदेची १०००, तापीची २१.

सांगायचं काय (अरे किती बोलते ही :D) की खूप नावं पाहिजेत…अगदी खूप. एका माणसाला एकच नाव जन्मभर कसं पुरणार? किती माणसं असतात एकात. गर्दी असते. रात्री लिहिणारी वेगळी. सकाळी वाचणारी वेगळी. भंकस करणारी माणसं वेगळी, फिलोसोफीवाली वेगळी. चर्चसमोर पाणीपुरी खाणारी वेगळी, डॉक्टर बनणारी वेगळी.

तुला लहानपणी एकच नाव होते हे मला म्हणून आवडत नाही.

~परिणीता

उत्सव

उत्सव कशाकशाचे असतात… झाडांना पाने फुटण्याचा उत्सव, फुले येण्याचा..फळे धरण्याचा उत्सव… रोपे अंकुरण्याचा, पिके उन्हात सोनेरी होण्याचा उत्सव…

पुराचा उत्सव….पूर ओसरण्याचा उत्सव.. इजिप्त मध्ये अजूनही वफा-अल-नील साजरा होतो..कशाचा माहितीये? नाईलला (तांबे सर म्हणतात नील म्हण 🙂 पूर येण्याचा उत्सव! नाईलचा पूर म्हणजे High Aswan धरण पूर्ण
होण्याआधी इजिप्तसाठी lotteryच ना..भरमसाठ पाणी आणि भरमसाठ श्रीमंत गाळ..सोन्यासारखा गाळ…शेते फुलवणारा..सोने का है मोल सोणिया, मिट्टी है अनमोल सोणिया, etc etc .. त्या वाळवंटातल्या लोकांना दूर डोंगरात पडणारा पाऊस कळायचाच नाही…पण नाईल अचानक पाण्याने फुलायची…मग कथा आणि उत्सव त्या भोवती गुंफले जाणारच..

Nile Flood Festival in Egypt, 1961 source: ahram.ord.eg

आता आपल्याला गाळ आणि पूर दोन्ही नको..पाणी पाहिजे, नदी वगैरे झंजट नको.

पण पुराचे चिवट उत्सव अजून तशेच टिकून आहेत बिहारमध्ये..आपण तसे बेरकी. रामकुंडात डुबक्या मारतो..बोरवेलच्या पाण्यात 🙂

सिंधमध्ये, सिंधू नदीच्या विस्तीर्ण मुखाजवळ पूर आल्यालावर एक उत्सव असायचा आणि पूर ओसरल्यावर परत एक! सही ना.. तसे सिंधी लोक मला आवडतात. त्यांचे सिंधुशी खूप घट्ट नाते, हिल्सा माशावर बसणारा पांढरा दाढीवाला सिंधू देव त्यांचा बॉस.. आणि अजूनही एखण तिज, चेटी चंद, चालिहो हे सगळे नदीशी जोडलेले उत्सव..

and you know what..नद्यांचे पण Happy Birthday असतात.. (of course आपण ठरवलेले)

Image result for Narmada festival february Amarkantak
Narmada Janmotsav at Amarkantak Source: palpalindia.com

झेलमचा भाद्रपदात, गंगेचा जेष्ठात, तापीचा आषाढ शुद्ध सप्तमीला, गोदावरीचा माघात..नर्मदेचापण माघातच झाला काही दिवसांपूर्वी.. and the best part is तेव्हा अमरकंटकच्या मंदिरात actually फुगे लावले होते..can you beat that?! 🙂

कृष्णेचे तर किती उत्सव..कृष्णामाईपासून कराड, औदुंबर, संगम माहुली, कोटेश्वर , सगळीकडे वेगळे वेगळे. तुळा संक्रांतीला कावेरीचा जन्मोत्सव..

कसली &*&*गिरी ना..नद्यांचे कसले कपाळ वाढदिवस..नर्मदा बघ किती अशक्य जुनी नदी..माणूस पृथीवर सरळ चालायला शिकला नव्हता तेव्हा पासून ती वाह्तीये आणि आपण गेल्यावर देखील वाहणार आनंदाने…आणि आपण तिला Happy Birthday करुन फुगे लावणार 😀

पण बर असतं हेपण. नद्या खूप जुन्या आहेत, आपल्या पेक्षा कितीत्तरी म्हाताऱ्या म्हणून काही त्यांचा जन्मोत्सव करायचा नाही असे थोडेच आहे? हे सगळे आपल्यासाठी.आता हेच बघ ना…तवांग मध्ये Nyamjangchhu नदी काठचा उत्सव तारखेला धरून नाही..जेव्हा दुर्मिळ क्रौंच तिच्या तीरावर विणीच्या हंगामात हलकेच उतरतात तेव्हा party starts 🙂

नाजूक पक्षी हक्काने तीरावर उतरले की..किंवा कोणीतरी ओळखीचे खूप दिवसांनी गेटपाशी आले की झाला उत्सव..साजरा करा किंवा न करा…मला तर दोन-दोन दिवस मिळाले 🙂 पण नो फुगा 😐

~परिणीता 

छोटी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्यांची

सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नद्यांचे माहेरघर आहेत. येथून दोन प्रकारच्या नद्या उगम पावतात: दक्षिण वाहिनी: ज्या विस्तीर्ण, महराष्ट्रापल्याड जाणार्या आहेत, आणि पश्चिम वाहिनी नद्या, ज्या तशा छोट्या, सुबक आणि ओघवत्या आहेत. मोठ्या दक्षिणवाहिनी नद्यांमध्ये आहेत गोदावरी (आमची नदी, मी नाशिकची.), भीमा, कृष्णा आणि कोयना. पश्चिमवाहिनी नद्या अनेक आहेत, जसे की दमणगंगा (गुजरातेत जाणारी, कदाचीत नदीजोड प्रकल्पात भरडून निघणारी), काळू ,शाई (यांवर मुंबईसाठी मोठी धरणे नियोजित आहेत) उल्हास, वैतरणा (मुंबईला पाणीपुरवठा करणार्या), सावित्री (महाडचे रासायनिक प्रदूषण रीचवणारी), वशिष्ठी, (कोयनेचे/दुष्काळी भागाचे पाणी न मागताच आपल्या ओटीत सामावणारी, व नंतर लोटे परशुरामच्या रासायनिक प्रदूषणाने आपले मासे, जीवसृष्टी गमावणारी) शास्त्री (महराष्ट्रातील कदाचित एकमेव मुक्तवाहिनी नदी!), कर्ली (तळकोकणातला हिरा!) इत्यादी. Continue reading “छोटी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्यांची”

तुझे नाव काय गं सये?

बियास आणि सतलज या नद्यांमधला ‘दोआब’ हा भाग अत्यंत सुपीक आणि सुंदर. मी नद्यांचा अभ्यास करते. त्यादिवशी मी नद्यांवरील परिवहन प्रकल्पाबद्दल वाचत होते. त्यात या नद्यांवरील प्रकल्पाचा होणारा पर्यावरणीय परिणाम अभ्यासाला गेला होता. वा, परिवहन प्रकल्पांचा वेगळा EIA (Environmental Impact Assessment) ? नवीन आणि चांगली गोष्ट आहे की, हे कधी झाले, मी मनात म्हटले. या अभ्यासाचे मुख्य कार्यालय हाँगकाँग असणार आहे.

हाँगकाँग? मी परत वाचले. बियास आणि सतलजचा अभ्यास हाँगकाँगमध्ये बसून करणार? काहीतरीच.

पण काहीतरी चुकलेच होते. नकाशावरील नद्या अगदी नाजूक, छोट्याश्या दिसत होत्या. आपल्या पंजाबच्या बियास आणि सतलज या खानदानी नद्या. विस्तीर्ण गाळाची पात्रे, सुरेख तट. संस्कृती घडविणा-या या नद्या पंजाबमध्ये इतक्या नाजूक नक्कीच नाहीत. परत नीट बघितले. मी वाचत असलेला अहवाल हाँगकाँग सरकारचा होता आणि या सतलज, बियास अणि हो, झेलमसुद्धा! या नद्या भारतातील नाही, तर हाँगकाँगमधील होत्या! Continue reading “तुझे नाव काय गं सये?”