Resilience

Resilience आणि सहनशीलता निसर्गाकडून शिकावी…किंवा मांजरांकडून. मी आज अनोळखी गावाच्या sidewalk वर चालताना हरवले तर समोर एक सुकडी, झुपकेदार शेपटीची मांजर माझ्याकडे बघून हसली. हायला. ही ओळखीची!

खूप वर्षापूर्वी आपल्या घराच्या पार्किंग मध्ये यायची..मग गायब झाली.. ती आत्ता दिसली बघ. चेहऱ्यावर “दुनिया देखी है बॉस” अशी शांतता. परत आली.

ऑस्ट्रेलिया मध्ये दोन मोठ्या नद्या आहेत. मरे आणि डार्लिंग, त्यांचा delta एक आहे. सुंदर, lyrical नद्या. आपल्यासारखेच Australian लोकांनी पण त्यांचे सगळेच पाणी पिऊन टाकले. समुद्राला भेटे पर्यंत नद्या कोरड्या… पण या वर्षी बेभान पाउस झाला… मरे नदीने असे वाहते पाणी २३ वर्षात बघितले नव्हते… तिच्या तीरावरच्या थकलेल्या Eucalyptusआणि Red Gum बनांच्या खोल खोल अंधाऱ्या मुळापाशी आता थंडगार पाणी पोचले.

एखाद्या नीरव रात्री ऐकले तर झाडे पाणी पिताना ऐकू येतील. आपण जाऊ एकदा.

पाण्यामुळे Macro invertebrates वाढले… मग पक्षी, छोटे मासे, मग मोठे मासे…. सुरेल- बेसूर बुल frogs….खेकड्या सारखे yabbies.. एका भरपूर पावसाने नदीत जी productivity ची लाट उसळवली, ती थेट estuary पर्यंत…आता समुद्रापर्यंत पोचली! ‘सचैल गोपी न्हाल्या गं.’.

Pelicans at sunset.
पुरा नंतरची मरे-डार्लिंग फोटो: abc.net.au

तशीच आपली कृष्णा..हिचे समुद्रा जवळचा प्रवाह वर्षे सरता सरता शून्यावर आले २००६ मध्ये. सगळी नदीची गाणी, कविता घाला चुलीत….पण या वर्षी पूर आलाच .
भारताने गंगेचे इतके पाणी रोखले, फराका बांधावरून इतके वळवले की सुंदरबन खारे होत गेले… तुला माहितीये, तिथले वाघ अतीव क्रूर आणि man eaters होण्या मागचे हे मोट्ठे कारण आहे…क्रौर्य आणि बांध. 🙂

पण कितीही तोंड पाडून बसा, रड घ्या, कोरड्या नदीवर कविता करा.. पाऊस येणारच. पुढे-मागे होईल, कमी जास्त होईल, अगदी २३ वर्षांनी येईल.. पण येणार.

पूर म्हणजे नदीचा उत्सव. पूर्वी बिहारमध्ये पौर्णिमेच्या आसपास पूर आला की लोक नावांमधून फिरायचे, चंद्राची, नदीची गाणी गायचे…. आता नदीला मारूनमुटकून शिस्त लावण्यासाठी बांधलेले embankment फुटले की कहर होतो फक्त.

आणि अंत बघितला की अघटीत पाउस येतोच..हवामान बदलतं..बांध फुटतात…रुस्क्या नद्या ओथंबून वाहतात. धरणांनी जास्त बांधले तर पूर रौद्र होत जातात… सिंधू नदीचे झाले तसे.

सजल वाटा समुद्राकडे वाहतात.

Journeys end in lovers meeting.

ते सोड, पण ही मांजर इतके समुद्र ओलाडून इथे कशी आली? लवकर बुक केले म्हणून चांगले डील मिळाले असेल तिला. 😉

or, like a wise friend says, journeys get new horizons when lovers meet. 🙂

~परिणीता 

नावं

Above: खलघाट येथील नर्मदा फोटो: परिणीता

मुझे जाँ न कहो मेरी जाँ, मेरी जाँ..
जाँ न कहो अंजान मुझे,
जान कहाँ रहती है सदा..

संजीव कुमार काय सही होता ना यात.. आणि गीता दत्त..तिच्यासाठीच होत हे गाणं.. actually you know what जान वगैरे राहू दे, एका नदीचे नावपण एक राहत नाहीत..बदलत जातं..

दगडांवरून खळखळ उड्या मारते ती ‘रेवा’,
गंभीर, घरंदाज, मागे न वळणारी ती ‘नर्मदा’.

जिला बांधता येत नाही ती ‘गंगा’.
खाली मान घालून सगळ्यांचं सगळं ऐकते ती ‘जान्हवी’…
परदेशी जाते तेव्हा सुलक्षणी ‘पद्मा’..
समुद्रात विलीन होताना ढगांकडे बघणारी ‘मेघना’.

आपल्या पुस्तकी fantasy साठी ‘सिंधू’,
सिंधच्या लोकांना पुरांनी हैराण करते ती ‘पुराली’,
अफगाण्यांना जबाबदार वडील वाटते तेव्हा ‘अब्बासिन’,
कधी आकाशाचा तुकडा चोरते तेव्हा ‘निलाब’

तापत-तळपत, विदर्भ-खानदेशातून जाते ती ‘तापी’,
डोकं उशाशी घेऊन आश्वस्त करते ती ‘अर्कजा’.

शक्तीस्वरूप वाहते ती ‘भीमा’,
विठ्ठलाच्या पायी उगीच रेंगाळते ती ‘चंद्रभागा’.

गंगेची १००० नावे, नर्मदेची १०००, तापीची २१.

सांगायचं काय (अरे किती बोलते ही :D) की खूप नावं पाहिजेत…अगदी खूप. एका माणसाला एकच नाव जन्मभर कसं पुरणार? किती माणसं असतात एकात. गर्दी असते. रात्री लिहिणारी वेगळी. सकाळी वाचणारी वेगळी. भंकस करणारी माणसं वेगळी, फिलोसोफीवाली वेगळी. चर्चसमोर पाणीपुरी खाणारी वेगळी, डॉक्टर बनणारी वेगळी.

तुला लहानपणी एकच नाव होते हे मला म्हणून आवडत नाही.

~परिणीता

तुझे नाव काय गं सये?

बियास आणि सतलज या नद्यांमधला ‘दोआब’ हा भाग अत्यंत सुपीक आणि सुंदर. मी नद्यांचा अभ्यास करते. त्यादिवशी मी नद्यांवरील परिवहन प्रकल्पाबद्दल वाचत होते. त्यात या नद्यांवरील प्रकल्पाचा होणारा पर्यावरणीय परिणाम अभ्यासाला गेला होता. वा, परिवहन प्रकल्पांचा वेगळा EIA (Environmental Impact Assessment) ? नवीन आणि चांगली गोष्ट आहे की, हे कधी झाले, मी मनात म्हटले. या अभ्यासाचे मुख्य कार्यालय हाँगकाँग असणार आहे.

हाँगकाँग? मी परत वाचले. बियास आणि सतलजचा अभ्यास हाँगकाँगमध्ये बसून करणार? काहीतरीच.

पण काहीतरी चुकलेच होते. नकाशावरील नद्या अगदी नाजूक, छोट्याश्या दिसत होत्या. आपल्या पंजाबच्या बियास आणि सतलज या खानदानी नद्या. विस्तीर्ण गाळाची पात्रे, सुरेख तट. संस्कृती घडविणा-या या नद्या पंजाबमध्ये इतक्या नाजूक नक्कीच नाहीत. परत नीट बघितले. मी वाचत असलेला अहवाल हाँगकाँग सरकारचा होता आणि या सतलज, बियास अणि हो, झेलमसुद्धा! या नद्या भारतातील नाही, तर हाँगकाँगमधील होत्या! Continue reading “तुझे नाव काय गं सये?”