धराशायी

कोणाच्या भाग्यरेखा कोणाला कुठे घेऊन जातील.. you know what…निसर्गात बरोबर-चूक काही नसते. फक्त असते…त्याला बरोबर-चूक हा aluminium-चांदी वर्ख आपण चढवतो. लखलख-चमचम आवडते 🙂

यही देखो.. नदीने समुद्रात गेलेच पाहिजे. त्यात तिची परिपूर्ती. तसं नाही झालं तर चक्रच थांबेल. एक छोटी नदी मोठ्या समुद्राला नाही मिळाली म्हणजे एक लांब साखळी तुटली की खळकन…हजारो वर्षे एकमेकात विश्वासाने गुंफलेले हात निसटले की गर्दीत..

ओके, yes. I get it. I get it so well.

पण अशाही काही आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.. Okavango नदी…Angola, Namibia आणि Botswana तून वाहणारी.. संपन्न …१५०० किमी पेक्षा लांब..आणि माहितीये ती बोत्स्वानात पोचल्यावर नुसतीच धावधाव करून पसरते..give up मारते. पूर्वी, म्हणजे लिटरली हजारो वर्षापूर्वी तिथे एक सरोवर होते, मग ते आटले पण तरी ही बया तिच्या जुन्या डगरीने तिथेच जाऊन पोहोचते आणि मग सगळ्या पाण्याची वाफ होते…
महत्वाचा तो तिचा प्रवास.. त्याचे असणे नव्हेच. ती नवी-जुनी, ती कधी कुणी..

Image result for Okavango delta
Okavango Delta Photo: CNN

माझी मैत्रीण राहते इथे..फेमो..सांगते कधी रात्री झोपाताना सगळे कोरडे असते आणि सकाळी जाग येते ती direct नदीत! तिच्या लॉग-केबिनमधून बाहेर आले की समोर हिप्पो 🙂या सगळ्या unpredictability मधे सौंदर्य आहे बॉस. हार्टब्रेकिंग सौंदर्य. ती, तेव्हा तशी..ती बहराच्या बाहूंची..

अशा खूप आहेत जगभर, ज्यांचा delta नाहीच मिळत समुद्राला. तू सांगितलेस, समुद्राला नाही मिळाली तर नदी “धराशायी” होते… किती सुंदर शब्द आहे, धराशायी…पृथ्वीवर निजणारी..

आफ्रिकेतली सगळ्यात लांब नदी नायगर..हिची बहिण बनी..ती यडी सहारा वाळवंटाकडे अगदी आपली वाट वाकडी करून जाते… आणि बनवते “मसिना”!.. वाळवंटाजवळ एक हिरवा, पूर येणारा, भात वाढवणारा आणि मासेमारी करणारा प्रदेश! बनी नाही मिळत समुद्राला.

आपल्याकडे तर रेलचेल आहे ना. I love Rann of Kutch. त्याची ती खारी, चंदेरी माती, तो खारा निष्ठुर वारा..आणि that promise of a river! एकटी फिरले होते खूप.. इथे पूर्वी अरबी समुद्रच होता…खूप पावसाळ्यात आजदेखील सगळं वाळवंट पाण्याने भरून जातं.

DSC00469
Little Rann of Kachh Photo: Parineeta Dandekar

इथे एक नदी येते लगबगीने, charting her old remembered ways to the sea..पण मग तिची गोची होते… समुद्र कुठेय? शोधताना तिचे पाणी अनेक दिशांनी धावते आणि पसरते इथेच.. ही लुणी नदी..कच्छच्या रणात विरघळते..

तशीच रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात…प्रत्येकीची आपली कथा. प्रत्येक झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं..स्फोट होतो सृजनाचा..इतका की जीव बिचकतात जरा, मग ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये येतात लाखो-लाखो Flamingos आणि Pelicans आणि Painted Storks ..सगळं वाळवंट गुलाबाचं रान करून टाकतात..त्यात कोल्हे हिंडतात आणि देखणी गाढवं आणि मोर…हा वेगळाच उत्सव…
सगळे wild misfits..वेडे पीर..भटके जिप्सी..यांची भाषा यांचीच.. समुद्रात न जाणारी नदी काय, पूर येणारं वाळवंट काय, देखणी गाढवे काय, मीठाचे शुभ्र डोंगर बनवणारी माणसे काय..आधांतरी तरंगणारे भूत-दिवे काय!

आधी आपली सिंधुपण सामील व्हायची या सगळ्या गोंधळात..तिची उपनदी कोरी या भागाला भिजवायची, मग १८००s मध्ये एक भूकंप झाला आणि सगळंच बदललं..

असो. सांगायचं काय होत ते विसरलेच…. खरं तर सांगायचं फारसं काही नसतं, एक-दोन तारा जोडायच्या असतात कधी, कधी चुकार प्रतिबिंब बघायचं असतं, चाफ्याचं एखादं फुल उचलून केसात खोचायचं असतं, ओंजळभर हसायचं, पापणीभर पाणी साठवायचं असतं, एखादी अर्थहीन-absurd गोष्ट सांगायची-ऐकायची असते. मुद्दा असा नसतोच बहुतेक… पुढे खूप दिवस पुरतं हे..पण कशाला हे सगळं? असो.

धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट..But thats ok. वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी परत बरसतेच.

आपला समुद्र आत असतो कधी. शांत रात्री गाज ऐकू येते बघ?

चिनाब, सिंधू, सोहनी

पार चना दे..

कच्ची मेरी मिट्टी, कच्चा मेरा नाम नी,

कच्चीयाना होणा है कच्चा अंजाम नी..

कच्चीये ते रक्खीये ना उम्मीद पार दी..

घड़िया, घड़िया, आवे घड़िया

सुर-सोहनी हे सिंध मधील शाह अब्दुल लतीफ भिताई या विलक्षण कवी, संत, किमयागार, सुफी गायक यांच्या कथेवर रचलेले काव्य…मुरलेल्या लोककथेसारखे कोणी म्हणतात हे खरे होते, घडले होते.. सोहनी खरंच चिनाब नदीत बुडली..तिची गाणी खरंच तिनेच गायली होती..

किंवा त्या आधीचीही असेल… गोष्ट महत्वाची, सांगणारे बदलत जातात..

मेहेरला भेटायला जाताना सोहनीला चिनाब नदी ओलांडावी लागायची. ती तर कुंभार, सुंदर माठ घडवायची, त्यातलाच एक घडा उराशी धरून ती पल्याड जायची. एकदा तिच्या नणंदेने हे बघितले आणि हळूच तिच्या नेहमीच्या घड्याच्या जागी कच्चा घडा ठेवला.

सोहनी वादळी रात्री नदीत उतरली आणि अर्ध्यात आल्यावर तिला कळले की घडा विरघळतोय…नदीतील मगरी तिचा पाय धरत आहेत..पाणी नाका-तोंडात जात आहे.. आणि विश्वासू घडा काही साथ देत नाही.

अनेक कथांची, गाण्यांची, चित्रांची सुरुवातच या जादुई प्रसंगाने होते, ज्यात सोहनी आणि मेहेर दोघे घड्याला विनवत आहेत ..आणि घडा हतबलतेने म्हणत आहे, “मी नाही तुला पार घेऊन जाऊ शकत सोहनी…आपण दोघेही विरघळणार आहोत…”

18 Century miniature depicting Sohni, Mahiwal and Chenab Wikimedia Commons
18 Century miniature depicting Sohni, Mahiwal and Chenab Wikimedia Commons

मला ‘कशी काळ नागिणी, सखे गं वैरीण झाली नदी” हे गाणे ऐकून नेहमी क्षणा-क्षणाला विरघळत जाणारा घडा गच्च धरून नदी पार करणारी सोहनीच आठवते 😦 “प्राणांचे घे मोल नाविका, लावी पार, ने आधि”…

सिंधू आणि चिनाब तीरी अनेक सुफी मशिदी आहेत, जुन्या, भग्न. तिथे भरजरी रंगांनी सोहनीची चित्रे आणि तिची गोष्ट रंगवलेली आहे. आणि सिंध मधील शेतकरी, मासेमार अजूनही सूर-सोहनी गुणगुणतात.

चिनाब जेव्हा भारतातून पाकिस्तानात जाते तेव्हा तिचे नुसते पात्र रुंदावत नाही, तिच्या भटकभवान्या धारांमध्ये अनेक गोष्टी गुंफल्या जातात. या गोष्टी चिनाब भोवतीच का रचल्या गेल्या? वारीस शाहच जाणे 🙂

अनेकांनी अनेक रंगात सांगितलेली सोहनीची गोष्ट , तिची गीते, तिच्या कविता म्हणजेच आजची चिनाब. चिवट होती ती. “कच्चे घडने जीत ली नदी चढी हुई, जहां मजबूत कश्तीयो को किनारा नहीं मिला”..

रांझाने चिनाबच्या तीरावर आपली बासरी वाजवली, हीर त्याला चिनाबतीरीच दिसली. मिरजा-साहिबां इथलेच. सस्सी-पन्नू मधल्या सस्सीला लहानपणी चिनाबमधे सोडले होते.

गम्मत म्हणजे, चिनाब म्हजे जशी चंद्र-नदी (चेन-आब), तशी ती भारतात चंद्र-भागा. चंद्रा ही चंद्राची मुलगी आणि भागा सूर्याचा मुलगा.

थोडक्यात काय, चिनाब असो, पृथ्वी असो, अनेक गोष्टी या शाहण्या म्हाताऱ्यानी बघितल्या आहेत. शब्द बदलत जातात, चेहरे बदलतात. पण गोष्ट तीच…खूप जुनी.

Every great story is the same story.

~~ परिणीता

सिंधू आणि मस्त कलंदर!

कोण होता हा लाल शाहबाझ कलंदर? पाकिस्तानात त्याच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकला माथेफिरू ISIS ने..८० लोक मेले..सगळीकडे होतेच आहे हे…कशाला वाईट वाटून घ्यायचे… परवाच तू सीरियाचे सांगितलेस..Aleppo बघायचे होते ना.. आता उत्खननात सापडल्यासारखे झाले.. चालायचेच. शहरं संपतात… संस्कृती संपतात… कारण नसताना युद्ध होतात…सृष्टी-स्थिती-लय.

मग शाहबाझ कलंदरच्या दर्ग्यावर बॉम्ब टाकण्याचे कशाला मनाला लाऊन घायचे? कोण हा? काय संबंध त्याचा-माझा?

पण कसंय ना..जगातल्या कमी जागा बघायच्या होत्या…सेहवान शरीफ त्यातली एक… कधीतरी सिंधला जाणार…सिंधू बघणार… झुलेलालचे नदीतले घर बघणार…आपल्या मुर्शिदला भेटायला येणारे हिल्सा मासे बघणार…मग नदीतीराने सेहवान गाठणार…शाहबाझ कलंदरची न संपणारी धम्माल बघणार…कोणजाणे त्या मानवापलीकडे गेलेल्या बायकांमध्ये …त्या वेड्या फकीरांमध्ये, दर्वेश्यांमध्ये, भिकार्यांमध्ये…काहीतरी ओळखीचे दिसेल..त्यांच्या बरोबर एखादी गिरकी मी पण घेईन..

हा कधीतरी इराण मधून सिंधू किनारी आला 12व्या शतकात…कवी, गायक, संगीतकार, संत..आणि मग इथलाच झाला.. जसे सिंधूच्या तीरावर अनेक पाणवठे आहेत, हिरवे ओयासिस आहेत तशाच याच्या गोष्टी. धुरकट भकास वाळवंटात जिथेजिथे हिरवा रंग आहे तिथेतिथे कलंदरचा स्पर्श आणि त्याच्या गोष्टी आहेत. धर्माच्या पलीकडचा हा.

शिया जागा म्हणून सेहवानवर बॉम्ब टाकला म्हणे.. अर्रे, तो तर हिंदू-मुसलमानांच्या पलिकडचा.. दर्यापंथी हिंदू त्याला राजा भ्रतहरी मानतात…काही नवनाथांचा अवतार म्हणतात..काही झुलेलाल म्हणतात, काही झिन्दापीर म्हणतात..काही सुफी संत आणि कलंदर पंथाचा प्रमुख म्हणतात..

नाडलेल्या, झिडकारलेल्या, विचित्र Weirdos चा देव, असे देव मुळात कमी. जोवर लोक आहेत तोवर लाल शाहबाझ कलंदर आहे…अबिदाच्या गाण्यात आहे, बुल्लेह शाहच्या, सचल सरमस्तच्या शब्दात आहे, सिंधूच्या वेड्यावाकड्या, कोरड्या-खाऱ्या पाण्यात आहे, धरणामागे अडकलेल्या हिल्सा माशात आहे. बॉम्बने काय होणार…

Hilsa.jpg
सिंधूचे मोहना मासेमार आणि हिल्सा फोटो: The Dawn

सिंधू नदीला आपल्या तालावर नाचवणारा संत.. त्याच्या धम्मालमध्ये कोण नाचत माहितीये..नुसते देश परदेशातले वेडे फकीर नाहीत, तर बायका, तृतीयपंथी , ओळख विसरलेले, ओळख नसणारे, जग नको असणारे…

याचे सेहवान “सेहवान शरीफ” होण्याआधी शिविस्थान होते..मोरोक्कोच्या इब्न बटूटाने याचा उल्लेख केला आपल्या बखरीत केला… पर्शिया आणि भारतामधले सिंधू नदीतीरावरचे महत्वाचे ट्रेड रूट… अशा ठिकाणी कट्टर धर्म टिकत नाही. अनेकानेक लोकांच्या घामात,चलाखीत, हसण्यात, रडण्यात, प्रेमात, व्यवहारात, कलेत कट्टरतेचा रंग उडत जातो…मुंबईत होते तसेच….

संध्याकाळ कलली की सेहवान शरीफ दर्ग्यात लोक घुमू लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात, धम्माल चढत जाते, भिनत जाते रक्तात. .. सईद, पीर, फकीर, मजहूब, सगळे एक होतात. हजीरी येतात..फकिरी येतात..संसारात बुडलेली बाई आपला बुरखा फेकून फकिरी होवून जीवघेण्या गिरक्या घेते निळ्या फरशीवर..

‘लाल की मस्तानी’ केस मोकळे सोडून गोलगोलगोलगोलगोल फिरते… म्हणते माझे संसारिक आयुष्य माझ्या मुर्शिदने मला दिलेली “आझ्माइश” आहे…सकाळी ती परत कपडे बदलून घरी जाते.. उरुसात मेंदीने भरलेली ताटे जातात हिंदूकडून मुसलमानाकडे-शिया कडून सुन्नी कडे, बाईकडून तृतीयपंथीयाकडे..न संपणारे आहे हे..उरूस  म्हणजे काय माहितीये…नुसते मातम नाही… मिलन! प्रभुशी एकरूप होणे! लग्नच!

कलंदरच्या लाल रंगात सिंधू नदी आहे संचारलेली…याला कोण बॉम्बने शांत करणार..

लाली मेरे लाल कि, जित देखू उत लाल.
लाल देखण मै गई, मै भी हो गई लाल..

चार चिराग तेरे बलन हमेशा
पंजवा बालन आइया बला झूलेलालन,
सिंधड़ी दा, सेहवन दा सखी शाहबाझ कलंदर!
दमा दम मस्त कलंदर!!

~परिणीता

नर्मदा-शोण-जोहिल्ला

पुण्य आले की पापही आले… पूजा आली की निर्भत्सना आली… पावित्र्य आले की विटाळ आला… देवी आली की देवी नसलेल्या, कम-देवी आल्या.

भारतात नद्या देव्याच आहेत असे नाहीत…काही नुसत्या ‘नद्या’ आहेत..काही त्याहून कमी आहेत. कर्मनाशा, किर्तीनाशा, फाल्गु..

आणि माझी आवडती जोहिल्ला.

नर्मदा खोर्याबद्दल वाचताना ही नदी, तिच्या नावातला तो नाद खूप आवडला होता. नर्मदा, शोण किंवा सोनभद्र आणि जोहिल्ला यांचा उगम तसा एकमेकांच्या जवळचा. अमरकंटक biosphere reserve मधला. नर्मदा मैकाल पर्वताची लेक. राजकन्या. मैकालला नर्मदेचे लग्न देखण्या सोनभद्र बरोबर करायचे होते. नर्मदेला एकदा सोनभद्रला बघायचे होते. तिने आपली दासी आणि सखी जोहिल्ला हिला आपले जरतारी कपडे नेसवले आणि सांगितले जा, बघ तर शोण कसा आहे तो. जोहिल्ला गेली.

पण अगदी Bollywood मध्ये होते तसेच झाले. शोणला वाटले हीच नर्मदा. काही कथा म्हणतात त्याने तिच्याशी लग्न केले, काही म्हणतात त्याने फक्त तिचा हात हातात घेतला, काही म्हणतात ते हसून बोलले. काहीही असो.

नर्मदेने हे बघितले व एका क्षणात सगळे पाश तोडून ती पश्चिमेकडे धावली.

शोणला आपली चूक उमगली. आपण जिचा हात धरला ती काही वैभवशाली राजकन्या नाही, यःकश्चित दासी आहे ती..
त्याने नर्मदेला बोलावले, पण ती स्वाभिमानी नदी काही परत फिरली नाही.
विषण्ण होवून शोण पूर्वेला निघून गेला..गंगेत विलीन झाला आणि बंगालच्या उपसागराकडे गेला..
नर्मदेने आपले स्वतःचे खोरे बनविले आणि अरबी समुद्रास मिळाली…कुमारिका राहिली.

पण जोहिल्लेचे काय झाले? तिची काही चूक नव्हती.. तिने शोणला होकार दिला की नाही हे देखील माहित नाही.
पण जोहिल्लेची पूजा होत नाही. तिचे पाणी पवित्र नाही मानले जात.
ती फक्त शोण आणि नर्मदेच्या मधली गैरसोय.

अशी ही जोहिल्ला.

~परिणीता 

राधा~यमुना

साहिरने कहर केला आहे तो ‘ना तो कारवां की तलाश है’ मध्ये. मी ते गाणे अनेक अनेक अनेक वेळा ऐकले असीन. नेहमी नवे काहीतरी हाती येते. अस्सल कलाकृती सारखे.

त्यातली एक ओळ म्हणजे ‘बहुत कठिन है डगर पनघट की..अब क्या भर लाऊ मै जमना से मटकी’..Somehow हे इतके आवडते की काही reports मध्ये पण घुसडवले आहे :p

सांगायची गोष्ट अशी की कारवां मधल्या या lines खुसरोच्या आहेत…”मेरे अच्छे निझाम पिया, बहुत कठिन है डगर पनघट की..अब क्या भर लाऊ मै मधवा से मटकी”…इथे कृष्ण नाही तर सूफी संत निजामुद्दीन औलिया आहे 🙂

साहिरने मात्र कारवामध्ये त्याचे ‘नंदकिशोर’ केले आहे.. (त्यात कोण नाही? 🙂

शाम, राधा आणि नदी हे समीकरणच आहे. इतके की शेवटी राधा वैतागुन म्हणते “नदी नारे न जाओ शाम, पैय्या पडू” ( का, तर तो पलिकडे जाऊन सौतन आणेल म्हणून. deep rooted राधा insecurities 😉 )

तेरा श्याम बड़ा अलबेला, मेरी मटकी में मार गयो डेला
कभी गंगा के तीर, कभी यमुना के तीर.. कभी नदियन नहाये अकेला

हे रंग खूप आनंदी आहेत.. वैतागलेले, त्रासिक, चहाडीखोर, भांडखोर..पण आनंदी.

मग यमुनातीराचे parochial जग सोडून शाम “greener pastures” कडे जातो. तेव्हा कविकल्पना वगैरे ठीक, पण खरा वाटतो तो कबीराचा दोहा, अबिदाच्या आवाजात..

‘भला हुआ मोरी मटकी फुटी, मै पनिया भरन से छूटी रे’..

बरंच झालं. घागर नको, यमुना नको, शाम नको. काहीच नको. कृष्ण द्वारकेला, गोमती तीरी जाताना राधेने म्हटले असेल कदाचित.

फार pessimistic झाले का? मग इथे आपले गुलझार आणि रितुपर्णो (<3 you) म्हणतात कृष्ण गेला होता मथुरेहून परत एकदा..

मनोहर वेश छोड़ नन्द राज
सर से उतारके सुन्दर ताज
फिर काहे बांसुरी बजाओ?
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?

धीरे धीरे पहुचात जमुना के तीर
सुनसान पनघट मृदुल समीर
उसे काहे भूल ना पाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ

ही खरी कविकल्पना 🙂

~ परिणीता 

शहरं

सोकी बंदर नावाचे छोटे बेट आहे सिंधू नदीच्या मुखाजवळ. आपल्या मुंबईसारखे. काही दशकांपूर्वी दृष्ट लागेल असे समृद्ध…तलम कापड आणि मग्रूर व्यापारी यांनी भरलेले. हळूहळू समुद्र आत आला आणि सिंधू मागे पडत गेली. सोकी बंदर आज एक वठलेले, मिठाने भरलेले गाव आहे… इतके गरीब की आरशासारखे लख्ख. कचरा नाहीच.

गोमती नदी, अंह, द्वारकेची गोमती, गंगेची उपनदी नाही, अरेबिअन समुद्रात आत आत शिरत असे. Archaeological evidence असे सांगतो की १४०० BC पासून इथे अनेक समृद्ध शहरे वसली. त्यांनी समुद्राला रोखून धरायचे खूप प्रयत्न केले. भिंती बांधल्या, गोमतीला बांधून घालायचा प्रयास केला… पण प्रत्येक द्वारका बुडलीच.

आज देखील गोमती नदीचे १.५ किमी पात्र समुद्राच्या आत सापडते. आणखी काय काय सापडते तिथे माहितीये….दगडी भिंती, दगडी anchor, मोती, हरप्पन काळातील Lustrous Red Ware Pottery. अनेक संस्कृतींचे अवशेष…पण आपण अडकलोय फक्त कृष्णाच्या गोष्टीत..

Related image
समुद्रातील दगडी Anchor Photo: National Institute of Oceanography

तशीच Cleopatra आणि Julius Caeser यांची Alexandria…Cleopatraचा अख्खा राजवाडा गिळला पाण्याने…आपण सगळे विसरलो होतो त्याला, पण चिरतरुण Cleopatraच्या गोष्टी संपल्या नाहीत. काही वर्षापूर्वी समुद्रात उत्खनन झाले आणि काही लाजणारे, भग्न अवशेष दोरखंडांनी हवेत आले. (त्यांना आतच बरे वाटत असेल कदाचित)

आणि नाईल नदीच्या मुखाशी, delta मधे होते वैभवशाली Heracleion..Egypt चे सर्वात संपन्न बंदर… पण तुला Heracleion ची खरी गम्मत माहितीये..इथे Helen of Troy आणि Paris भेटले होते. तेच दोघे ज्यांना भेटता क्षणी कळले की आपल्या भेटीने मंथन होणार..

Image result for Heracleion
Heracleion चे अवशेष   फोटो: Atlasobscura.com

या शहराचे नाव पडले Heracles या ग्रीक देवावरून. कोण होता हा माहितीये? Alcmene आणि देवांचा देव Zeus यांचा मुलगा. यांची गोष्ट अगदी तुझ्या अहिल्ये सारखी… Zeus देखील एकदा Alcmene च्या नवऱ्याचे: Amphitryon चे रूप घेऊन आला. पण त्यांच्या मुलाला ग्रीसने देव केले… ना Alcmene अहिल्येसारखी शिळा झाली, ना Zeus शापित झाला. असो.

तर हे Heracleion 1200 वर्षा पूर्वी Mediterranean समुद्रात बुडाले. नाईल कमी पडली. ज्याला बंदरांचा राजा, इजिप्तचे अविभाज्य अंग वगैरे म्हटले होते त्याला लोक पुरते विसरून गेले! राहिले काय तर Helen of Troy आणि Paris च्या गोष्टी.

शहरे चिरंतन नसतात. गोष्टी चिरंतन असतात. शहरे विसरली जातात…कितीही संपन्न, श्रीमंत, सुंदर असली तरीही. वेड्यांच्या गोष्टी मागे राहतात. त्याच गोष्टी कधी मग या झोपलेल्या शहरांना नदीच्या, समुद्राच्या कुशीतून उठवतात.

शहरे वृद्ध, थकलेली: गोष्टी तरुण, सदा नव्या. प्रत्येक सांगणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे वय स्वतःच ढापणाऱ्या!

म्हणून मला ती बाग खूप आवडते. तिथे लगबग चालणारे लोक, व्यायाम करणारी गमतीशीर माणसे, भंकस करणारे तरुण तरुणी, नारळाची झाडे, जवळच असणारे mangroves, त्या शेजारची बिट्टी नदी, तिच्या पलीकडचा समुद्र.. हे सगळेच. उद्या, परवा, हजार वर्षानंतर समुद्राने बागेला अगदी गिळले तरी हरकत नाही. बाग आणि तिच्या गोष्टी माझ्यासाठी चिरंतन आहेत.

बाकी नदी आणि समुद्राची भरती ओहोटी सुरूच राहणार की.

~परिणीता

मनस्विनी

युरोपातल्या नद्या जाम सुन्दर. खूपशा शिस्तबद्ध . नाकासमोर, channels मधून चालणाऱ्या, काही जाणीवपूर्वक माफक वळणं घेणाऱ्या, अगदी थोड्या मनसोक्त वाहणाऱ्या. Paris मधली सीन, किंवा रोम मधली Tiber किंवा Rhine-Main-Danube चा सुंदर कालवा. अमेरिकेत अजून एक category: “जाणीवपूर्वक मनसोक्त” वाहणाऱ्या: Wild and Scenic Rivers. अपार सुंदर, तरीही स्वतः भोवती अस्पर्श्तेचे न दिसणारे कुंपण वागवणाऱ्या. संस्कारित.

Picture
सरळसोट नदी फोटो: britishgeographer.com

या घाण नाहीत, त्यांच्यात गटारे सांडत नाहीत, त्या अगदीच कोरड्या होत नाहीत. रंगीबेरंगी होड्या, काही मोठ्या बोटी डौलदारपणे सांभाळतात.. सभ्य.

आणि आमच्या बघा.. कोसी, बागमती, उतावली… बकाल, उफराट्या, कधी पाण्याने तुडुंब भरतील आणि कुचकामी धरणे- embankments तोडतील नेम नाही. बर, channels चे या ऐकत नाहीत. या आपले “once in 100 years” रेकॉर्ड्स सुद्धा बिंदास मोडतात (Record ठेवणारे पण त्यांचेच सुपुत्र!).

या Erosion ने जुन्या जागा खातात आणि deposition ने नव्या बनवतात. मनस्विनी.

काही माणसं बेशिस्त नद्यांसारखी. आपल्या मुलभूत प्रश्नांची उत्तरे आपल्यातच, आपल्या तोकड्या पण रक्ताच्या रसरशीत अनुभवात शोधणारी. अभिजात साहित्य वगैरेशी फारसे देणे घेणे नसणारी. पुस्तकात, कवितेत, साहित्यात आपल्या अनुभूतीच्या कुबड्या न शोधणारी.. काहीतरी तोडणारी आणि काहीतरी बनवणारी.

लखलखीत कोरी अनुभूती यांनाच येत असावी.

आणि मी बघ.. प्रत्येक भावछटेसाठी मला कुठेतरी, कधीतरी, काहीतरी, कोणीतरी तिसऱ्याने लिहून ठेवलेलं आठवतं आणि त्याने मग मी जाम खुश होते. तुला ती Nerolac ची ad आठवतीये? “मेरा वाला क्रीम”..”मला अगदी अस्सच म्हणायचं होतं”. “तंतोतंत” ( How I hate that word) सगळी second hand अनुभूती. Readymade कपड्यांमध्ये अंग बसविण्यासारखी. ch$&^@*@.

विदुषक मधल्या चंचले सारखे “ते सत्य माझेच , माझ्यापुरतेच असते , कारण त्यावर माझ्या जीवनाची रक्तमुद्रा असते . त्याचे दान करता येत नाही, कि इतरांकडून त्याचा स्वीकार करता येत नाही.” असं पाहिजे.

देखा, इथेपण ओरिजिनल नाही लिहिता येत :p

~ परिणीता

नावं

Above: खलघाट येथील नर्मदा फोटो: परिणीता

मुझे जाँ न कहो मेरी जाँ, मेरी जाँ..
जाँ न कहो अंजान मुझे,
जान कहाँ रहती है सदा..

संजीव कुमार काय सही होता ना यात.. आणि गीता दत्त..तिच्यासाठीच होत हे गाणं.. actually you know what जान वगैरे राहू दे, एका नदीचे नावपण एक राहत नाहीत..बदलत जातं..

दगडांवरून खळखळ उड्या मारते ती ‘रेवा’,
गंभीर, घरंदाज, मागे न वळणारी ती ‘नर्मदा’.

जिला बांधता येत नाही ती ‘गंगा’.
खाली मान घालून सगळ्यांचं सगळं ऐकते ती ‘जान्हवी’…
परदेशी जाते तेव्हा सुलक्षणी ‘पद्मा’..
समुद्रात विलीन होताना ढगांकडे बघणारी ‘मेघना’.

आपल्या पुस्तकी fantasy साठी ‘सिंधू’,
सिंधच्या लोकांना पुरांनी हैराण करते ती ‘पुराली’,
अफगाण्यांना जबाबदार वडील वाटते तेव्हा ‘अब्बासिन’,
कधी आकाशाचा तुकडा चोरते तेव्हा ‘निलाब’

तापत-तळपत, विदर्भ-खानदेशातून जाते ती ‘तापी’,
डोकं उशाशी घेऊन आश्वस्त करते ती ‘अर्कजा’.

शक्तीस्वरूप वाहते ती ‘भीमा’,
विठ्ठलाच्या पायी उगीच रेंगाळते ती ‘चंद्रभागा’.

गंगेची १००० नावे, नर्मदेची १०००, तापीची २१.

सांगायचं काय (अरे किती बोलते ही :D) की खूप नावं पाहिजेत…अगदी खूप. एका माणसाला एकच नाव जन्मभर कसं पुरणार? किती माणसं असतात एकात. गर्दी असते. रात्री लिहिणारी वेगळी. सकाळी वाचणारी वेगळी. भंकस करणारी माणसं वेगळी, फिलोसोफीवाली वेगळी. चर्चसमोर पाणीपुरी खाणारी वेगळी, डॉक्टर बनणारी वेगळी.

तुला लहानपणी एकच नाव होते हे मला म्हणून आवडत नाही.

~परिणीता

रहस्य

Above: Reef inside Amazon River Source: The Guardian

Amazon नदीच्या तळाशी मोठ्ठं कोरल रीफ सापडलं ना..प्रवाळाचं बेट..नदीत कोरल..अरे पण कोरलला खार आणि गोड पाणी लागतं, त्याला तापमान एक अंश इथे तिथे होवून चालत नाही, सूर्यप्रकाश लागतो, Amazon म्हणजे उकळा चहा..काळ.. हिरवं गर्द पाणी..तिची ती रिओ नेग्रो तर कशी शार काळी…मातकट-दाट-sluggish नदी… मग कसं शक्य आहे हे?

पण आहे खरं.

नदीच्या पोटात काय काय असत ना, बोलेलं न बोलेलं, पाहिलेलं- न पाहिलेलं, स्पर्श-अस्पर्श.. खरं-खोटं.

Amazon तशीही फार गुपिते बाळगणारी बाई..तिच्या १३००० फूट खाली अजून एक नदी वाहते.. Hamza..Amazon ची अदृश्य, वाहती बहिण..हिच्यामुळे Amazon आपल्या मुखाजवळ कमी खारी आहे..

आपली हिरण्यकेशी पण तशी..गुहेतुन अचानक बाहेर येते म्हणून आपल्याला कोण कौतुक, पण ही बया अनेक किलोमीटर वाट काढत आहे limestone खडकातून, गोड बोलून त्या दगडाला विरघळवत.. आपल्याला ते दिसत नाही, म्हणुन ते नाही, इतकेच.

सीतेने शाप दिला ती फल्गु…मस्त वाहते गयेत वाळूखाली..अशीच वाहत आलीये ती शेकडो वर्षे, अदृश्य फक्त आपल्यासाठी..खरंतर सीतेनी वरदानच दिले की फाल्गुला…आपल्याच अशा अंधाऱ्या, एकट्या विश्वात वाहण्याचे..

वाशिष्ठीत इतके इतके प्रदूषण, शंकरच वाटते ना ती, विष प्यालेली? आणि तिच्यात इतक्या मगरी! मगरी काय pollution indicator आहेत का? हसू नको, नाहीयेत त्या indicator.

पण आहेत तिथे.

magar
Crocodile in Vashisthi River Photo: Parineeta

गंगेत आणि सिंधुत डॉल्फिन..समुद्रात असतात डॉल्फिन..आणि समुद्रातल्या आणि नदीतल्या डॉल्फिनमध्ये तसा जास्त फरक नाही.. ते इथे कसे? कारण गंगा ‘गंगा’ होण्याच्या आधी आणि सिंधू ‘सिंधु’ होण्याच्या आधी टेथिसचा समुद्र होता तिथे.

स-मु-द्र. होच. गंगेतले आंधळे, हिंस्त्र शार्क, नदी सारखेच गुपित ठेवणारे..mythical की खरे?

नद्या आपल्या खऱ्या खुणा विसरत नाहीत इतक्या लवकर. तुमचं ते हरिद्वार पण समुद्रात होतं. गंगेला पवित्र, boring देवी आपण केलं, तशी ती जन्मतःच wild 😉

बंगालच्या

Image result for Salinity Measurements Collected by Fishermen Reveal a “River in the Sea” Flowing Along the Eastern Coast of India
Freshwater pulse in Bay of Bengal Source:natureasia.com

समुद्रात जाते गंगा.. २५०० किमी ची नदी नाही ती.. अजून हजारो किमी वाहते.. थेट सुंदरबन पासून परद्वीप पासून श्रीलंके पर्यंत.. समुद्राच्या आतुन आपला मार्ग काढत..मासेमारांनी सांगितले हे शास्त्रज्ञांना..you know what..मला कोळी लोक solid आवडतात..sailors of the wide waters..

तर…आपल्याला काय माहिती असते? प्रकाशातले सगळे..आपले ठोकताळे, आणि आपलीच उत्तरं. मग त्या उत्तरात काही बसले नाही के त्याची ठाकाठोकी..#@^ गिरी नुसती .

ही डार्क विश्वे जास्त सुन्दर वाटतात…अस्पर्श..अदृश्य..murky…dangerous..पण (म्हणून?) रोरावती जिवंत.

तर असो.

~परिणीता 

काठोकाठ भरलेली वाशिष्ठी

मला नेहमी आश्चर्य वाटते, चिपळूण जवळ वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीचे नाव वाशिष्ठी का? इथे परशुराम राहिले, मग त्यांचे पिता जमदग्नी होते, रेणुका होती, वाशिष्ठी कुठून आले? अजून तरी कळले नाही, तुम्हाला माहिती आहे ?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१५ च्या नव्या अहवालात सगळ्यात जास्त प्रदूषित नद्या महाराष्ट्रात आढळल्या आणि त्यात वाशिष्ठीचा नंबर वर लागला.. यात आश्चर्य नाही. गेली अनेक वर्षे वाशिष्ठी आणि लोटे परशुरामचे रासायनिक प्रदूषण हे समीकरण झाले आहे. तसं पाहिलं तर वाशिष्ठी म्हणजे कोकणातली एक महत्वाची नदी. लांबी उणीपुरी ७० किमी.. पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यातूनच वाहणारी. हिचा उगम मी बघितलेला नाही, पण सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर वरून वशिष्ठी उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी सैर करत दाभोळजवळ अरबी समुदराला मिळते. वाशिष्ठीची लांबी आणि येवा ( म्हणजे दर वर्षी वाहणारे पाणी, ७५% विश्वासार्हतेने, म्हणजे ७५% वेळा तरी तेवढे वाहेल इतके) तिच्या मैत्रिणीच्या, शास्त्री नदी सारखाच आहे. वाशिष्ठीचा येवा ४४९१ दलघमी  (दश लक्ष घन मीटर) तर शास्त्रीचा  ४४९६ दलघमी.. पण दोन्ही सख्यांमधले साम्य तिथेच थांबते. Continue reading “काठोकाठ भरलेली वाशिष्ठी”