ब्रह्मपुत्र

ब्रह्मपुत्र नद का? बंगालच्या सागरात मिळणारे खूप नद आहेत तिथे. रूपनारायण, पगला, दामोदर, कुमार, गोदाधारी etc. तिथेच का? कारण कळल नाही.

पण एक आहे बघ. विनाशकारी पूर येतात या नद्यांना. ब्रह्मपुत्र तर वाट बदलण्यात माहीर. आज ही तर उद्या ती. तुम्ही भारी नदीच्या शेजारी गाव वसवाल, तर पुढच्या वर्षी गाव गायब. 1954 पासून त्याने ४००,००० हेक्टर जमीन खाल्लीये, २५०० गावे हाकलली आहेत..

याची geomorphology बाकी नद्यांपेक्षा वेगळी. गंगा मुखापाशी थोडी वाहवते, पण तशी युक्त वेणी. हा मात्र सारखे आपला जटा सोडतो, बांधतो.
प्रेमाने मोठीमोठी बेटे बनवणार. माजुली बघ. जगातले सगळ्यात मोठे नदीतले बेट. पण हा त्याला थपडा मारत राहणार.

dsc06731
भला मोठा विस्तार फोटो : परिणीता 

त्याच्यावर पावित्र्याचे बंधन नाही. परशुराम कुंड सोडून त्याची इतर कुठे मारून-मुटकून पूजा होत नाही. गलिच्छ लोक त्याच्यात बुड्या मारत नाहीत. मुक्तपणे वागायला त्याला license आहे. बाकीचा मक्ता गंगेकडे.

त्याच्या मुक्त वागण्याला आणखी एक कारण आहे. हिमालयातून प्रचंड वेगात आणि तीव्र उतारांवरून तो धावत येतो, अरुणाचलच्या डोंगरांमधून येताना अफाट शक्ती असते त्याच्यात. आणि अचानक हे डोंगर संपतात आणि निझोमघाट, पासीघाट आणि परशुराम कुंड जवळचे सपाट भाग लागतात. अगदी अचानक.

हूश

अर्र्रे, पण करणार काय इतक्या उर्जेचे? सौम्य लग्न पचवत नाही त्याला. strugglerचे दिवस आठवतात. मग तो ती सगळी तांडव-शक्ती आणि गाळ घेऊन आडवातिडवा पसरतो. पूर्ण आसाम आपल्या पाण्याने आणि गाळाने व्यापून टाकतो. आणि इतके करून पण त्याचे भागत नाही. ते त्याला परत, परत, परत करायचे असते…दर वर्षी वेगळा मार्ग शोधायचा, नवी गावे बुडवायची.

DSC05638.JPG
गोट्यांचा पसारा फोटो: परिणीता 

U Turn मारण्यात हा पटाईत. भारतात येताना मोठा U घेतो पश्चिमेकडे..the Great Bend..तर भारतातून बांगलादेशात जाताना परत मोठा hairpin टर्न दक्षिणेकडे.
आणि तुला माहितीये, आपल्याला मारे वाटते आपल्याला समोरचा कळलाय वगैरे, पण ब्रह्मपुत्र भारतात येण्याआधी १६०० किमी धावलाय तिबेट मध्ये. He has a past. A heavy, heavy baggage.

त्याच्या अशा बेधुंद वागण्याला अजून कारणे आहेत..हिमालय, जिथे तो खूप वाहतो, तो दर शतकात १ मीटर वर येतोय. भूमी, जिच्या कुशीतून तो येतो ती देखील स्थिर नाही. १९५० आणि १८९७चे सगळ्यात मोठे भूकंप इथे झाले आहेत. आपले कसे ना, आपले बरे-वाईट बालपण मागे सोडता येते. मच्छिमार वस्ती आठवण म्हणूनच राहते, याचे तसे नाही. हा एकाच वेळी बाल, तरुण आणि म्हातारा. चिरतरुण तसाच चिरम्हातारा देखील.

थोडक्यात काय, इतके baggage आणि इतका प्रवास केलेल्या कोणाच्याच वाटते एकतर उभे राहायचे नाही… राहिलातच तर हे पूर्ण जाणून की ती व्यक्ती फक्त आपली नाही, इतकेच नाही तर पुढच्या लाटेत ती तुम्हाला देखील उद्वस्त करू शकते.
काहीही झालं तरी ब्रह्मपुत्राचा allegiance शेवटी बंगालच्या उपसागराशीच.

बाकी सब timepass Boss .

~परिणीता 

संगम

अनेक वर्षे नवी गाणी ऐकत नव्हते. उगीच एक तोरा होता ते सगळे फालतू असा 🙂 मग वय होत गेलं तसा जनरलीच तोरा कमी झाला.

म्हणूनपण गुलझार आवडतो. तो उगा judgement देत नाही, बेरकी, पकाऊ म्हातारा होत नाही..सुन्दर पांढरे केस असलेला, पांढरा कुडता घातलेला Student of the Year वाटतो.. त्याची भाषा कशी evolve झाली ना..आज ऐकत होते “धीरे धीरे जरा दम लेना, प्यार से जो मिले गम लेना” 🙂 आणि पुढे “आजा कुछ करते है, आ लाकिरे पढते है..”

गुलझारला “हाथोकी लकिरे” चे लई वेड..

त्याचे खूप जुने आणि लाडके गाणे आहे (मुकेश could be so good when he was good and so terrible otherwise :p).. “पुकारो मुझे नाम लेकर पुकारो, मुझे तुमसे अपनी खबर मिल रही है”, त्यात एक ओळ आहे.. “तुम्हारे हथेलीसे मिलती है जाकर, मेरे हाथकी ये अधुरी लकीरे..”

तुला गम्मत माहितीये, जिथे Rio Solimoes आणि रिओ नेग्रो या रेखा मिळतात न, तिथे त्या अनेक किलोमीटर एकमेकात मिक्स होत नाहीत…तशाच वाहतात..एकच प्रवाह..पण अर्धा काळा, तर अर्धा मातकट..अगदी ६-७ किलोमीटर अशाच, एकमेकात, पण काठाकाठाने. त्यांचं सगळंच वेगळं..तापमान, dissolved सोलीड्स, sediments.. पण मग हळू हळू Amazon तयार होते..

Image result for Rio Solimoes Rio Negro
Meeting of Rio Solimoes and Rio Negro Source: awesci.org

नाईलचे पण तसेच.. ती ‘नाईल’ बनते कोरड्या खार्तोम मध्ये..तो पर्यंत Lake ताना मधून येणारी Blue Nile आणि Lake Victoria मधून येणारी White Nile या वेगळ्या. मजा बघ, आपण कसे सावळ्या कृष्णाला निळा म्हणतो, तसे इथे sediments ने जडशील झालेल्या काळ्या नाईलला ब्लू म्हणतात 🙂

White मोठी, तिचे sediments भुरे….तिला बघून छोटी ब्लू इतकी बिचकते की कधी कधी तिचे पाणी मागे जाते 🙂

Canyonlands मध्ये Colorado आणि ग्रीन नद्या भेटतात. Colorado म्हणजे “The Color Red”…ग्रीन Wyoming मधलाच हिरवा रंग पिऊन येते.. त्यापण जरा बेताने मिसळतात एकमेकात. (हे लिस्टीत add कर)

आणि आपली भागीरथी आणि अलकनंदा देवप्रयागमध्ये गंगाबाई होतात तेव्हा भागीरथी कशी नितळ, अलकनंदा मातकट..ती खूप जास्त sediment वाहवत आणते, खूप erosion करत..मोठमोठाले खडक आपटून-आपटून विरघळवते..
या पण अशाच रेखा..दुरून येऊन एकमेकात मिसळणाऱ्या..आधी लांब, जरा फटकून, आणि नंतर एकसंध प्रवाह बनून आपले नशीब कोरणाऱ्या

रेखा बरोब्बर म्हणते (ही बाई सॉलिड आहे) “लोग केहते के बस हाथ की रेखा है, हमने देखा है दो तकदीरोंको, जुडते हुये” ..फिर गुलझार 🙂

मीपण लई शब्दच्छल करते कदाचित..

त्यापेक्षा ओके जानू ऐकावे..चोर गाणे आहे तसे..सगळे visuals चोरलेत…”ना समझसी एक लडकी, पुरे दिन की चोर निकली” 🙂

~परिणीता 

उत्सव

उत्सव कशाकशाचे असतात… झाडांना पाने फुटण्याचा उत्सव, फुले येण्याचा..फळे धरण्याचा उत्सव… रोपे अंकुरण्याचा, पिके उन्हात सोनेरी होण्याचा उत्सव…

पुराचा उत्सव….पूर ओसरण्याचा उत्सव.. इजिप्त मध्ये अजूनही वफा-अल-नील साजरा होतो..कशाचा माहितीये? नाईलला (तांबे सर म्हणतात नील म्हण 🙂 पूर येण्याचा उत्सव! नाईलचा पूर म्हणजे High Aswan धरण पूर्ण
होण्याआधी इजिप्तसाठी lotteryच ना..भरमसाठ पाणी आणि भरमसाठ श्रीमंत गाळ..सोन्यासारखा गाळ…शेते फुलवणारा..सोने का है मोल सोणिया, मिट्टी है अनमोल सोणिया, etc etc .. त्या वाळवंटातल्या लोकांना दूर डोंगरात पडणारा पाऊस कळायचाच नाही…पण नाईल अचानक पाण्याने फुलायची…मग कथा आणि उत्सव त्या भोवती गुंफले जाणारच..

Nile Flood Festival in Egypt, 1961 source: ahram.ord.eg

आता आपल्याला गाळ आणि पूर दोन्ही नको..पाणी पाहिजे, नदी वगैरे झंजट नको.

पण पुराचे चिवट उत्सव अजून तशेच टिकून आहेत बिहारमध्ये..आपण तसे बेरकी. रामकुंडात डुबक्या मारतो..बोरवेलच्या पाण्यात 🙂

सिंधमध्ये, सिंधू नदीच्या विस्तीर्ण मुखाजवळ पूर आल्यालावर एक उत्सव असायचा आणि पूर ओसरल्यावर परत एक! सही ना.. तसे सिंधी लोक मला आवडतात. त्यांचे सिंधुशी खूप घट्ट नाते, हिल्सा माशावर बसणारा पांढरा दाढीवाला सिंधू देव त्यांचा बॉस.. आणि अजूनही एखण तिज, चेटी चंद, चालिहो हे सगळे नदीशी जोडलेले उत्सव..

and you know what..नद्यांचे पण Happy Birthday असतात.. (of course आपण ठरवलेले)

Image result for Narmada festival february Amarkantak
Narmada Janmotsav at Amarkantak Source: palpalindia.com

झेलमचा भाद्रपदात, गंगेचा जेष्ठात, तापीचा आषाढ शुद्ध सप्तमीला, गोदावरीचा माघात..नर्मदेचापण माघातच झाला काही दिवसांपूर्वी.. and the best part is तेव्हा अमरकंटकच्या मंदिरात actually फुगे लावले होते..can you beat that?! 🙂

कृष्णेचे तर किती उत्सव..कृष्णामाईपासून कराड, औदुंबर, संगम माहुली, कोटेश्वर , सगळीकडे वेगळे वेगळे. तुळा संक्रांतीला कावेरीचा जन्मोत्सव..

कसली &*&*गिरी ना..नद्यांचे कसले कपाळ वाढदिवस..नर्मदा बघ किती अशक्य जुनी नदी..माणूस पृथीवर सरळ चालायला शिकला नव्हता तेव्हा पासून ती वाह्तीये आणि आपण गेल्यावर देखील वाहणार आनंदाने…आणि आपण तिला Happy Birthday करुन फुगे लावणार 😀

पण बर असतं हेपण. नद्या खूप जुन्या आहेत, आपल्या पेक्षा कितीत्तरी म्हाताऱ्या म्हणून काही त्यांचा जन्मोत्सव करायचा नाही असे थोडेच आहे? हे सगळे आपल्यासाठी.आता हेच बघ ना…तवांग मध्ये Nyamjangchhu नदी काठचा उत्सव तारखेला धरून नाही..जेव्हा दुर्मिळ क्रौंच तिच्या तीरावर विणीच्या हंगामात हलकेच उतरतात तेव्हा party starts 🙂

नाजूक पक्षी हक्काने तीरावर उतरले की..किंवा कोणीतरी ओळखीचे खूप दिवसांनी गेटपाशी आले की झाला उत्सव..साजरा करा किंवा न करा…मला तर दोन-दोन दिवस मिळाले 🙂 पण नो फुगा 😐

~परिणीता 

उगम

गोदावरीचा उगम लहानपणी बघितला होता. ब्रह्मगिरीवर. इवलीशी धारा. तेव्हापण आश्चर्य आणि काहीसं disappointing वाटलं होतं. ही इतकुली नदीची सुरुवात?

पण नदीचा उगम एकटा नसतोच. कितीतरी धारा एकत्र येतात, दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या… एक प्रवाह बनतो. आपल्याकडे याचे फार अप्रूप. मग तिथे सुंदर शंकाराची मंदिर उभी राहतात, देवराई येते, कथा येतात. हा Sense of wonder किती महत्वाचा, नाही? आपल्याला हल्ली ती सोय नाही.

DSC00630.JPG

Burton आणि Speke ने म्हणे नाईलच्या उगमाचा शोध घेतला..१८५०s मध्ये त्यांचा प्रवास सुरु झाला..खुपसा पायी, कधी गाढवांवर..प्रवासात दोघेही आजारी पडले, त्यांच्यावर हल्ले झाले,स्पेक भयंकर जखमी झाला, त्याची दृष्टी जवळजवळ गेलीच..श्रेय खुपसे Burtonला मिळाले..त्यांचे टोकाचे भांडण झाले इत्यादी.. सगळे कुठे travel buddies असतात, काही बोटीला बांधलेले धीवर असतात.. पण गम्मत म्हणजे लेक विक्टोरिया जवळच्या आदिवास्यांना नाईलचा उगम माहित होताच..नुसता माहित नव्हता तर तो त्यांच्यासाठी पवित्र होता.

burton
Burton and Speke source: tiscali.co.uk

पण आपल्यासाठी मात्र नाईलच्या उगमाचा शोध Burton ने लावला. 🙂 तसेच अमाझोन चे. 18व्या शतकापासून तिच्या उगमाच्या खूप सुरस गोष्टी आहेत. अजूनही नव्याने शोध सुरू आहेत.

आपल्या भीमेचे गुप्त भिमाशंकर काय सुरेख आहे ना..किंवा कृष्णेचे पाषाणकाळे गारगार मंदिर..तिथे तर भूजल वर येते, त्यालाच उगम मानले आहे..जसे गंगेचा उगम म्हणजे बर्फाळ Glacier..

गंगेवर आपण जेव्हा तिच्या जन्मस्थळा जवळ ३३० धरणे बांधतो…किंवा अगदी छोटा भागीरथी Eco Sensitive Zone देखील जलविद्युत प्रकल्पांसाठी मोडीत काढतो.. तेव्हा ते नदीलाच मारण्यासारखे असते…. उगमाजवळ नदी खूप काही वहावत नेते..गंगेचे सुपीक खोरे बनले आहे ते हिमालयातील दगडातून..

तिबेटचे बर्फाळ पठार म्हणजे जगाचे छप्पर. किती नद्या तिथे जन्म घेतात..ब्रह्मपुत्र, सिंधू, सतलुज, घागरा, राक्षसताल आणि मानसरोवराला जोडणारी छोटी गंगा 🙂
तुला माहितीये, Alice जेव्हा सिंधूच्या उगमाच्या शोधात गेली तेव्हा तिचा प्रवास चीन मधल्या एका धरणापाशी येऊन थिजला..

vishuprayag26thjune-2013
Alaknanada Dam inundated by boulders during Uttarakhand Flood disaster. Source: Matu Jan Sangathan

असो. मुद्दा असा आहे की…मुद्दा नाहीच 🙂

नदीचा जन्म कसा होतो? कुठून होतो? कुठे म्हण्यायचे की ok, ही आता नदी…संध्याकाळ कधी होते नक्की? केव्हा संपते?

धारा की थेंब की ढग की वाफ की समुद्र की सूर्य?.. बारका देव..God of small things…मोठ्या देवांसमोर पळून जाणारा..”Big God howled like a hot wind, and demanded obeisance. Then Small God (cozy and contained, private and limited) came away cauterized, laughing numbly at his own temerity.”

छोटी ओंजळ सुंदर असते..एका थेंबात अख्ख्या नदीचेच का समुद्राचे गीत असते..है ना?

मला इतकेच कळते की ८.४ चे ८ झाले आणि उद्या ७ होईल.

~परिणीता

काठोकाठ भरलेली वाशिष्ठी

मला नेहमी आश्चर्य वाटते, चिपळूण जवळ वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीचे नाव वाशिष्ठी का? इथे परशुराम राहिले, मग त्यांचे पिता जमदग्नी होते, रेणुका होती, वाशिष्ठी कुठून आले? अजून तरी कळले नाही, तुम्हाला माहिती आहे ?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१५ च्या नव्या अहवालात सगळ्यात जास्त प्रदूषित नद्या महाराष्ट्रात आढळल्या आणि त्यात वाशिष्ठीचा नंबर वर लागला.. यात आश्चर्य नाही. गेली अनेक वर्षे वाशिष्ठी आणि लोटे परशुरामचे रासायनिक प्रदूषण हे समीकरण झाले आहे. तसं पाहिलं तर वाशिष्ठी म्हणजे कोकणातली एक महत्वाची नदी. लांबी उणीपुरी ७० किमी.. पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यातूनच वाहणारी. हिचा उगम मी बघितलेला नाही, पण सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर वरून वशिष्ठी उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी सैर करत दाभोळजवळ अरबी समुदराला मिळते. वाशिष्ठीची लांबी आणि येवा ( म्हणजे दर वर्षी वाहणारे पाणी, ७५% विश्वासार्हतेने, म्हणजे ७५% वेळा तरी तेवढे वाहेल इतके) तिच्या मैत्रिणीच्या, शास्त्री नदी सारखाच आहे. वाशिष्ठीचा येवा ४४९१ दलघमी  (दश लक्ष घन मीटर) तर शास्त्रीचा  ४४९६ दलघमी.. पण दोन्ही सख्यांमधले साम्य तिथेच थांबते. Continue reading “काठोकाठ भरलेली वाशिष्ठी”