काठोकाठ भरलेली वाशिष्ठी

मला नेहमी आश्चर्य वाटते, चिपळूण जवळ वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीचे नाव वाशिष्ठी का? इथे परशुराम राहिले, मग त्यांचे पिता जमदग्नी होते, रेणुका होती, वाशिष्ठी कुठून आले? अजून तरी कळले नाही, तुम्हाला माहिती आहे ?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१५ च्या नव्या अहवालात सगळ्यात जास्त प्रदूषित नद्या महाराष्ट्रात आढळल्या आणि त्यात वाशिष्ठीचा नंबर वर लागला.. यात आश्चर्य नाही. गेली अनेक वर्षे वाशिष्ठी आणि लोटे परशुरामचे रासायनिक प्रदूषण हे समीकरण झाले आहे. तसं पाहिलं तर वाशिष्ठी म्हणजे कोकणातली एक महत्वाची नदी. लांबी उणीपुरी ७० किमी.. पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यातूनच वाहणारी. हिचा उगम मी बघितलेला नाही, पण सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर वरून वशिष्ठी उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी सैर करत दाभोळजवळ अरबी समुदराला मिळते. वाशिष्ठीची लांबी आणि येवा ( म्हणजे दर वर्षी वाहणारे पाणी, ७५% विश्वासार्हतेने, म्हणजे ७५% वेळा तरी तेवढे वाहेल इतके) तिच्या मैत्रिणीच्या, शास्त्री नदी सारखाच आहे. वाशिष्ठीचा येवा ४४९१ दलघमी  (दश लक्ष घन मीटर) तर शास्त्रीचा  ४४९६ दलघमी.. पण दोन्ही सख्यांमधले साम्य तिथेच थांबते.

चिपळूण जवळची वशिष्ठी फोटो: परिणीता
चिपळूण जवळची वशिष्ठी फोटो: परिणीता

वाशिष्ठीची प्रमुख उपनदी म्हणजे खेडची जगबुडी! दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच, यावर्षी देखील हायवे बंद पाडला या बयेने! हिच्यावर दोन मध्यम प्रकल्प आहेत नातूवाडी आणि शिरवली. वाशिष्ठीच्या इतर उपनद्या किंवा नाले म्हणजे नारिंगी (छत्तीसगढमध्ये पण एक नारिंगी आहे, गोदावरीची उपनदी, काय मस्त, नारंगी रंगाचे पाणी! ;),  तांबी नदी, धावती नदी (:) ! आणि बैतरणी (जिच्या बद्दल नाव सोडता अजून काहीच माहिती नाही).

कोकणात जरी ३००० मीमी पर्यंत पर्जन्य होत असले तरीही तीव्र उतारांमुळे आणि जमिनीच्या रचनेमुळे हे पाणी तत्परतेने समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या ठक्क होतात, पण वाशिष्ठीचे गोडे पाणी मात्र कधीच कमी नसते. ती सदा भरलेली, वाहणारी असते.

पण जसे नदी कोरडी होणे घातक तसे ती सदा पाण्याने काठोकाठ भरलेली असणे देखील नदीसाठी घातकच. कुठून येते वाशिष्ठीत इतके पाणी?

चिपळूण मधली काठोकाठ भरलेली वाशिष्ठी फोटो: परिणीता
चिपळूण मधली काठोकाठ भरलेली वाशिष्ठी फोटो: परिणीता

हे पाणी तिचे नाही. हे कृष्णेचे पाणी आहे आणि हे अवजल येते १९२० MW कोयना जल विद्युत प्रकल्पातून जो साताऱ्यात आहे , सह्याद्री पर्वताच्या शिखराला. याचे विस्तीर्ण शिवसागर जलाशय हे कोयना १,२ आणि ४ टप्प्यातील पाणी साठवते. हे पाणी खरे तर दक्षिण -पूर्व वाहून कोयना नदीतून कृष्णेस मिळायला हवे,  पण आपण ते अडवून थेट उलटे वळवून कृष्णा खोऱ्यातून टाकतो कोकणात: वाशिष्ठी खोऱ्यात!

आणि हे काही थोडेथोडके नाही, हे आहे दर वर्षी १९०० दश लक्ष घन मीटर पाणी.. एक घन मीटर म्हणजे १००० लिटर.

कोयना जल विद्युत प्रकल्पाचा पहिला टप्पा १९६१ मध्ये कमिशन, म्हणजे सुरु झाला. जगात अनेक ठिकाणी असे उंचीचा आणि खोलीचा फायदा घेऊन बांधलेले जलविद्युत प्रकल्प आहेत, पण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी एका तुटीच्या खोऱ्यातून एका मुबलक पाणी असलेल्या खोऱ्यात कोणतेच प्रकल्प टाकत नाहीत. पाण्याची किंमत आपल्याला नव्याने कळायची गरज नाही. कृष्णा हे पाणी घेऊन पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र मध्ये जाते.

असे पाणी वळविणे ५० वर्षापूर्वी कदाचित समर्थनीय असेल, पण आज नाही. आता आपल्याला नवे पर्याय शोधावेच लागतील. 

या Diversion वर एक उपाय म्हणजे “reversible turbine” म्हणजे विजेची मागणी चढी असताना (सकाळी आणि संध्याकाळ-रात्री) पाणी कोकणात सोडायचे आणि दुपारी, मागणी कमी झाली की तेच पाणी खालच्या धरणातून वरच्या धरणात पंप करायचे. ऐकायला जरा विचित्र वाटले तरी हे “pump back storage” जगात अनेक, अनेक ठिकाणी कार्यान्वयित आहे. अगदी आपले घाटघर धरण देखील याच आधारावर चालते. असे नसते तर घाटघरनेही नगर सारख्या दुष्काळी भागातील पाणी ठाण्यात सोडले असते! आज हे चालेल आपल्याला? कोयनेचा drop जास्त त्यामुळे यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात, पण आपण गंभीर प्रयत्न केलेच नाहीत हे देखील खरे.

असो.

जिथे कोयना- कोळकेवाडी प्रकल्पाचा टेल रेस कालवा (म्हणजे पाणी सोडणारा कालवा) वाशिष्ठीत मिळतो तिथे तो जवळ जवळ या नदीएवढाच मोठा आहे….तुटीच्या कृष्णेचे कोकणात वाहणारे पाणी..

वशिष्ठी नदीत कोयनेचे अवजल जाताना फोटो: परिणीता
वाशिष्ठी नदीत कोयनेचे अवजल जाताना फोटो: परिणीता

बर, गेली अनेक वर्षे हे पाणी आपण व्यवस्थित वापरात नाही, अनेक अहवालांनी अनेक सुचना दिल्यानंतरही. चिपळूणचे पिण्याचे पाणी आणि काही क्षुल्लक सिंचन सोडले तर हे पाणी थेट समुद्रात जाते. सध्या जलसंपदा राज्यमंत्री श्री विजय शिवतारे म्हणत आहेत की हे पाणी मुंबईला वळविले जाईल. National Water Development Agency (NWDA) ने तसा जुजबी प्रस्ताव जरी बनवला असला तरी हे पूर्वी अनेक वेळा बोलून (फक्त) झाले आहे. आणि दुष्काळी भागाचे पाणी वाशिष्ठीत वाहतेच आहे.

नदीतील जीव हे तिच्या चढत्या-उतरत्या पाण्यावर अगदी विसंबलेले असतात. माशांचा अंडी देण्याचा, पिले बाहेर येण्याचा हंगाम हा नदीच्या ठोक्यावर (Pulse of the river!) अवलंबून असतो. जर एखाद्या नदीचा नैसर्गिक चढ-उतार आपण बदलला तर हे जीव भांबावतात. चढलेले पाणी उतरत नाही..पिले तग धरू शकत नाहीत.. अंडी वाहून जातात. हे देखील एक कारण आहे वाशिष्ठीतील मासे कमी होण्याचे.

अजून एक म्हणजे नदी चे मुख, delta किंवा Estuary.. हा एक अद्भुत जादुई प्रदेश आहे. मला कधी वाटते देव असेलच तर नक्की इथेच रहात असेल :p. तर इथला खारा आणि गोड्या पाण्याचा balance हा समुद्रातील आणि नदीतील माशांसाठी खूप म्हणजे खूपच महत्वाचा असतो. पाणी खूप गोडे असेल तर समुद्रातले मासे इथे अंडी द्यायला बिचकतात. खूप खारे असेल, तर समुद्री जीव नदीत वर पर्यंत येतात. सतत गोड्या पाण्याच्या भडीमारामुळे देखील वाशिष्ठी Estuary मधील मासे कमी होत आहेत.

गम्मत म्हणजे कोयनेच्या पाण्यामुळे वाशिष्ठी खोऱ्यात १९७८ मध्ये लोटे परशुराम वसाहत आली. आपले प्रदूषण नियंत्रणाचे कायदे, त्यांची अंमलबजावणी, प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि त्यातील अधिकारी ही एक अत्यंत depressing गोष्ट आहे. अनेक Common Effluent Treatment Plants, Effluent Treatment Plants, विविध स्कीम वगैरे करूनही वाशिष्ठीचे पाणीच नाही, तर लोटे जवळची जमीन देखील प्रदूषित आहे. Acidic आहे. Effluent नेणारया पाईपलाईन कापलेल्या, सडलेल्या असतात, शेत शिवारात प्रदूषित पाणी जाते, पिके जळतात, पशु मारतात, मातांच्या दुधात Heavy metals सापडतात. प्रदूषण नियंत्रण मंडळे मुद्दाम कमी प्रदूषण दाखवतात, त्यांचे ऑफिस लोट्याहून चिपळूणला हलवले जाते जेणेकरून “ताप” होणार नाही ई ई.

बघा भोइवाडीतील मासेमार मधुकर काशीकर या बद्दल काय म्हणत आहेत.

इथली मासेमारी जवळ जवळ संपली आहे. शेजारी शास्त्री नदीत अनेक मासेमार खेडी आहेत. इथे मात्र हात पाटीने वाळू उपसा करणे किंवा वाळू माफियांच्या हात खालची प्यादी होणे हे स्थानिकांचे ठरलेले. या प्रदूषणाचे परिणाम थेट दाभोळ पर्यत, म्हणजे वाशिष्ठी जिथे समुद्रास मिळते तिथपर्यंत पोचतात. दाभोळ मधले इम्तियाज मम्तुले मला सांगतात “आम्ही होडी काढतो ती हाडाची सवय म्हणून. बाकी खाडीत आता काय नाय.”

असे असूनही वाशिष्ठी संपली आहे का? नाही. नदी इतक्या सहजासहजी हरत नाही. आणि नदीचे खोरे ही गमतीशीर गोष्ट आहे. खोरे म्हणजे तो संपूर्ण भाग जिथे पडलेले पाणी वाहत वाहत कधीनाकधीतरी मुख्य नदीत येणार आहे. वाशिष्ठीचे खोरे आहे २२०० चौरस किमी चे. इथे वैविध्याची अचाट रेलचेल आहे! वेगवेगळ्या विहिरींपासून, पाणी वापराच्या सुंदर पारंपारिक पद्ध्तीपासून, चकाकणाऱ्या झर्यापासून, धबधब्यापासून छोट्या, नाजूक ओहोळापर्यंत, सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत.

यात जसे प्रदूषणामुळे होरपळणारी नदी आहे, तशीच अनेक खरी सांस्कृतिक रत्ने आहेत: विहिरी, बाव, तळी, जैवविविधतेने ओथंबणारे झरे, Climate Change पासून रक्षण करणारी खारफुटीची जंगले, बिबटे, कोल्हे, काकणेर, पावसाळ्यात अचानक फुलणारे आणि पाणी जिरवणारे जाम्भ्याचे सडे…. पाण्याजवळ राहणारे लोक आणि त्यांची छोटी गावे… 🙂

छोटे ओहोळ आणि नद्या
छोटे ओहोळ आणि नद्या

आणि वाशिष्ठीला अनेक जण मदत देखील करत आहेत: चिपळूण मधील तरुण कार्यकर्ता मल्हार इंदुलकर, अशोक कदम सरांची परिवर्तन सारखी संस्था, मासेमार संघांचे सदस्य आणि आपली जंगले, नदी, ओहोळ जपणारे, त्यावर प्रेम करणारे खोऱ्यातील अनेक लोक!

दारचे पाणी. पारंपारिक भूजल वापर व्यवस्था फोटो: परिणीता
दारचे पाणी. पारंपारिक भूजल वापर व्यवस्था फोटो: परिणीता

हा लढा जितका त्यांचा आहे, तितकाच तो आपला देखील आहे.

~परिणीता दांडेकर

parineeta.dandekar@gmail.com

 

12 thoughts on “काठोकाठ भरलेली वाशिष्ठी

 1. प्रयत्न उत्तम आणि परिणाम कारक आहे . अभिनंदन !!,
  फक्त काही ठिकाणी (बोलताना )इंग्रजी शब्दाला सोपे मराठी प्रतिशब्द देणे शक्य आहे. तसेच झरा , नाला , उपनदी , नदी , खाडी हे संधर्भ क्रमाने देता येतील. भविष्यात नदीखोऱ्या इतकाच नदी किनारा प्रदेश (Riparian habitats) , याचे संवर्धन महत्व मांडता येईल.

  Like

  1. खूप धन्यवाद सर. अगदी मान्य. मलाच स्वतःला परत ऐकताना इतके इंग्रजी शब्द सहज वापरले याचे वाईट वाटत आहे, आणि आश्चर्यपण :). या पुढे विचारपूर्वक प्रयत्न करीन.
   धन्यवाद,

   परिणीता

   Like

 2. यावेळी विडिओ पण टाकलात . छान. तुमचे वृत्तांत नेहमीच माहितीत भर टाकणारे असतात. प्रदूषण संपवणे, पाणी [अवजल] वाचवणे – वळवणे आणि जैव विविधता वाढवणे … पुन्हा एकदा तीव्रपणे समोर आले .
  धन्यवाद.

  Like

 3. अंबी नदी (पानशेत धरण )व मोसे नदी (वरसगाव धरण ) यांच्या उगम व प्रवाहाबद्दल माहिती असल्यास blogवर टाकावी , धन्यवाद ! सर्व लेख अावडले !

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s