“नदी”, “गंगा”, “सरिता”…या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे प्रवाह. वाहणे. वाहणे हा नदीचा धर्म, प्रवाह म्हणजे तिचा आत्मा. आज जेव्हा आपण आपल्या नद्यांची दैना बघतो, तेव्हा लागलीच कोणते शब्द आपल्या समोर येतात? प्रदूषण, अतिक्रमण, कचरा, दुष्काळ, पूर…
नदी वाहती नसणे हे आपण खूप सहज मान्य केले आहे का?
मग याला आपण खूप कारणे दिली..अगदी आमच्याकडच्या नद्या कधीच बारमाही नव्हत्याच मुळी, त्या कोरड्याच होत्या हा तर्क आपण ओढून ओढून थेट पावसाळ्यात पण सांगायला मागे पुढे बघितले नाही. शासनदरबारी कोरडी नदी इतकी सोयीस्कररित्या “सरकारमान्य” होवून बसली की कृष्ण पाणी तंटा लवादात महाराष्ट्राने सांगितले कृष्णा आमच्याकडे बारमाही कधीच वाहत नाही. यावर लवादाने आपल्याला अभ्यासपूर्ण रित्या फटकारले हे सांगायला नको.
प्रवाहाची आणि नद्यांची फारकत धरणांपासून सुरु झाली. ज्या संस्कृतीत आपण नद्यांचे अनन्वित गोडवे गातो तिथे नदीला बांध घालून पूर्ण कोरडे करणे हे अगदी राजमान्य आहे. कोणताही कायदा नदीचे मूळ नदीपण वाचवत नाही. यामुळे आपण अनेक नद्या कोरड्या ठाक केल्या. त्यांची जैवविविधता मारली, धरणाखाली नदीवर अवलंबून असणाऱ्या समूहांच्या: छोटे शेतकरी, मासेमार, नावाडी, ई .उपजीविकेची पुरती वाट लागली. असे करताना आपल्या Cost Benefit Sheet मध्ये नदी कोरडी करण्याच्या Costs कुठे दिसल्याच नाहीत. धरणांचे फायदे मात्र आपण हे फुगवले. आपले Accounting Fraud होते आणि आहे.

असे असताना जगभारत हळूहळू एक विचार प्रस्थापित होत आहे: पर्यावरणीय प्रवाह किंवा Environmental Flows. म्हणजे, नदीच्या परीसंस्थेसाठी, तिच्या जीवांसाठी, तिच्यावर अवलंबून लोकांसाठी आणि म्हणजेच नदीच्या अस्तित्वासाठी, पसाभर का होईना पण आणि नदीत ठेवणे. याचा अर्थ असा नाही की ज्या नद्या उन्हाळ्यात निसर्गतःच कोरड्या होत्या त्यांच्यात आपण पाणी भरून ठेवायचे, मात्र असा की नदीचा नैसगिक प्रवाह किंवा “hydrograph” जो आहे तो कमी अंशांनी सांभाळायचा. भारतात आत्ता आपण म्हणत आहोत की उन्हाळी प्रवाहाच्या फक्त १०-२०% आणि पावसाळी प्रवाहाच्या फक्त ३०% पाणी नदीत ठेवायचे. हे गणित प्रत्येक नदी साठी, तिच्या नैसर्गिक प्रवाहानुसार वेगळे असणार. हे करण्याचे खूप मार्ग आहेत. मुख्य म्हणजे आपली पाणी वापर Efficiency वाढवणे. मी महाराष्ट्र शासनाच्या “पर्यावरणीय प्रवाह” समितीची सदस्य होते. यात इतर सदस्य होते पर्यावरण विभाग मुख्य, जल संपदा सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक ई. आमच्या महाराष्ट्र जल संपती नियमाल प्राधिकरणामध्ये अनेक मिटिंग झाल्या. यात पर्यावरण विभागाचे मुख्य सोडाच, बाकी कोणतेहे कर्मचारी कधीच उपस्थित नव्हते. यावर कधी विस्ताराने बोलू.
असो. पण या गणिताच्या अगदी उलट बाजूला आहेत मुक्तवाहिनी नद्या. Free-flowing Rivers: नदीपणाची विद्यापीठे.

महाराष्ट्रात आणि भारतातच काय, जगभरात वाहती नदी हे आज अप्रूप आहे. आणि तरी देखील मुक्तवाहिनी नद्यांचे अनेक अनेक फायदे आहेत. हवामान बदलाच्या काळत तर मुक्तवाहिनी नद्या आणि त्यांच्या “ecological services” हा आपल्यासाठी insurance आहे. असे असूनही जगातील १७७ मोठ्या नद्यांपैकी उण्यापुऱ्या १/3 नद्या मुक्तवाहिनी आहेत. १००० kilometer पेक्षा जास्त लांबीच्या फक्त २१ नद्या या थेट समुद्रास मिळतात. आपली कृष्णामाई, जिच्या पाण्याबद्दल महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इतक्या तिरमिरीत भांडतात, ती अनेक वर्षे समुद्रास मिळत नाही. 1960s पर्यंत कृष्णेचे अंदाजे ५७ BCM (Billion Cubic Meters) पाणी समुद्रास मिळायचे, ते २००४ पर्यंत शून्यावर आले. त्यात अनेक बहाद्दर असे समजतात की नदीचे पाणी समुद्रास मिळाले म्हणजे ते “वाया” गेले. ही समजूत म्हणजे “Ecological Illiteracy” चे उत्तम उदाहरण. दुर्दैवाची गोष्ट अशी की अनेक अभियंता जे धरणे बांधतात किंवा ती plan करतात त्यांची ही लाडकी समजूत आहे. नदी जेव्हा समुद्रास मिळते तेव्हा ते फक्त पाणी आणत नाही, तर अत्यंत महत्वाचा असा गाळ: Silt देखील आणते. या गाळानेच सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण होतात, नदीपात्र आणि त्या भवतीची शहरे घडतात. या गाळाच्या अभावाने बांगलादेश, सुंदरबन, गोदावरी आणि कृष्णेचा त्रिभुज हा अक्षरशः समुद्रात बुडतो आहे.नदीचे मुख हे अत्यंत productive असते. गोड्या पाण्यातलेच नाहीत तर खाऱ्या पाण्यातले अनेक मासे या भागातच अंडी देतात, बालपण घालवतात.
यादी खूप मोठी आहे. गदिमा म्हणतात तसे
” काय सांगु रे बाप्पानो, तुम्ही अंधाराचे चेले,
नदी माहेराला जाते, म्हणूनची जग चाले”
भारतभरात अशा मुक्तवाहिनी नद्या अगदी बोटावर मोजण्याइतक्याच शिल्लक आहेत. प्रत्येक नदीवर बांध बांधायचे हे मोठ्ठे फायदे, आणि तिला वाहू द्यायचे फायदे काहीच नाहीत…असे असूनही काही नद्या आहेत…हिमालयात, पूर्वांचलात, पश्चिम घाटात, काही अशी रत्ने लपून आहेत. महाराष्ट्रात पण. त्यातलीच एक शास्त्री. हिच्या मुख्य प्रवाहावर अजून मोठे धरणे नाही, सहाय्यक नद्यांवर अनेक धरणे आहेत.

शास्त्रीचा उगम सह्याद्रीच्या प्रचित गडाजवळचा. तिथून ही सूर मारून रत्नागिरीच्या संगमेशवर येथे येते आणि तिथून वळत मुरडत जयगड जवळ अरबी समुद्रास: सिंधू सागरास मिळते. हिच्या जवळपास प्रत्येक संगमावर मंदिरे आहेत, देवराया आहेत. मार्लेश्वर मंदिर बाव नदीच्या उगमापास्शी आहे तर संगमेश्वर येथे शास्त्री, सोनवी, अलकनंदा यांचा संगम आहे. समुद्रा जवळ शास्त्री खोऱ्यात वेळणेश्वर आहे.

या बांध नसलेल्या नदीकडून आपल्याला काहीच मिळत नाही का? आम्ही ( मी, मृणालिनी वनारसे आणि अमोल गजेवार) हिच्या खोर्यात खूप हिंडलो. अनेक गावे बघितली जी शास्त्रीचे पाणी उचलून भाजीपाला पिकवतात, शेते जोपासतात. उंच वाड्यांमध्ये कुंडे आहेत, भूजल आहे.
इथले खारे पाणी देखील अत्यंत चविष्ट वांगी वाढवायला वापरले जाते. पाणी उचलण्याच्या पद्धती पण देशी: उक्ती!

मासेमारी पूर्ण खोर्यात चालते. बायका कपडे धुता धुता मासे पकडतात! याने किती स्वस्त प्रथिने मिळतात आणि घर कसे चालते ही कुठल्याच Cost Benefit Analysis मध्ये दिसते नाही. खाडीत तर अनेक मासेमार खाडीत आहेत. याचीच तुलना जर आपण शास्त्री शेजारीच असलेल्या पण लोटे परशुराम आणि कोयना प्रकल्पामुळे मरणासन्न झालेल्या वशिष्ठी खाडी बरोबर केली तर मुक्तवाहिनी आणि स्वच्छ नदीची किंमत लक्षात येते. असाच एक अभ्यास कर्नाटकातील शरावती नदी आणि मुक्त वाहिनी अघनाशिनी नदी यांच्या बद्दल झाला आहे. त्यातही वाहत्या नदीचे आपण गृहीत धरलेले फायदे बघून दिपून जायला होते.


संगमेश्वरमध्ये दर वर्षी पूर येतो. “धरण असते तर पूर थांबला असता”
आपल्याकडे कोकणात अनेक धरणे आहेत आणि अनेक धरणे असूनही ना चिपळूणचा पूर थांबला ना अर्जुना नदीचा. असो. सिंचन, मोठी धरणे आणि कोकण या बद्दल लिहावे तितके कमीच. ६००० कोटी रुपये खर्च करुनाहे KIDC, कोकण सिंचन मंडळाचे एकही मोठे किंवा मध्यम सिंचन धारण अजून पूर्ण नाही. नद्यांची मात्र आपण या कंत्राटदार-अभियंता कात्रीत वाट लावली.

मुक्तवाहिनी नद्या या नदीपणाची विद्यापीठे आहेत. भारतातील सगळ्यात जास्त धरणे बांधून आपण आपल्या सगळ्याच नद्यांची नाकाबंदी केली आहे. पण या धरणांनी आपोआप आपण सुजलांसुफलाम झालो का? नदीची, वहात्या नदीची किंमत कवडीमोल ठरवून आपण नक्की कोणाचा गल्ला भरला?
धरणे स्वतंत्र भारताची मंदिरे होती. महाराष्ट्रातही उजनी, कोयना, ई धरणांनी क्रांती घडवली. पण आता मुद्दा धरणांचा नाही तर पाण्याचा, लोकांचा, पर्यावरणाचा आणि नद्यांचा आहे. हे सगळे विलग नाहीत, एकाच विणीचे धागे आहेत.
जलव्यवस्थापनात बदल होत जातात. आपल्याच आकलनाचा कक्षा रुंदावत जातात. जायला पाहिजेत. Climate Change चे सत्य आपण विसरलो तर आपले दार थोठावतेच. या परीस्थित वाहत्या, निरोगी, उत्फुल्ल नद्या आपल्याला खूप काही देऊ शकतात. शास्त्री त्यातलीच एक.
तुम्हाला तुमच्या भागातील मुक्त वाहिनी नदी माहिती आहे का? आम्हाला सांगाल तिच्या बद्दल?
परिणीता दांडेकर
SANDRP
parineeta.dandekar@gmail.com
I never imagined ..rivers and detail information about it’s all angles. ..will be so interesting to read ..and to know..I admire your way of writting which makes us to get interest to read .Thank a lot for writting on such subject .keep it up.all the best
LikeLike
खूप धन्यवाद madame.
परिणीता
LikeLike
परी, तू दर वेळी नवी दृष्टी देतेस नदीकडे पाहायची. Thank you so much dear.
LikeLike
Thank you for for getting back Mrin 🙂 ❤
LikeLike