Above: तापी-पूर्णेची उपनदी सपन. फोटो: परिणीता
अर्कजा, सत्या, शामा, कपिला, सर्पा, तारा, ताम्रा, सूक्ष्मा, सहस्राकारा…कोण आहेत या सगळ्या?
आपण जसे लहानग्यास अनेक नावांनी हाक मारतो, तशी ही आहेत तापी माहात्म्या मधील तापी नदीची काही नावे .. तिचा वाढदिवस देखील असतो आषाढ शुद्ध सप्तमीला 🙂
महाराष्ट्रातल्या नद्यांची ओळख करून घ्यावी म्हटले, आणि सुरुवात तापीने. ही तशी थोडी दुर्लक्षित नदी. पण मला हिने खरी भूल पाडली जेव्हा लक्षात आले की अगदी विदर्भापासून ते पश्चिम घाटाच्या नद्या, सगळ्या तापीच्या बहिणी आहेत…अमरावतीतल्या सिपनेपासून नाशिकच्या गिरणेपर्यंत!

भारतातील पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये तापी नर्मदेनंतरची सगळ्यात लांब नदी.७२४ किमी. डावीकडून मिळणाऱ्या पूर्णा आणि गिरणा हिच्या महत्वाच्या उपनद्या, जवळ जवळ ४५% तापी खोऱ्याचा भाग हा यांनीच व्यापला आहे. पूर्णेचा उगम तापीच्या तसा जवळ, मध्य प्रदेश मधल्या बेतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांमध्ये. या खोऱ्याच्या डोक्यावर सातपुडा, तर दक्षिणेला अजंता आणि सातमाळा पर्वत रांगा. पश्चिमेला अरबी समुद्र. तापी खोऱ्याचा ८०% भाग महराष्ट्राचा मोडतो (जवळजवळ ५०,००० वर्ग किमी), अगदी थोडा मध्य प्रदेश (~९८०० वर्ग किमी) मध्ये तरी शेवटचा भाग आणि लहानगा त्रिभुज प्रदेश हा गुजरात मध्ये येतो (~३५०० वर्ग किमी). इतक्या मोठ्या खोऱ्यात सरासरी पावसाला तसा अर्थ नाही, तरी इथळी सरासरी आहे ८८० मिमी. जवळपास २५% खोरे हे वनांनी व्यापलेले आहे (आश्चर्य आहे!). महाराष्ट्रातील १६.७% भूभाग तापी खोऱ्यात येतो. ७५% विश्वासार्हतेवर तापीचा वार्षिक येवा आहे ६९७७ दशलक्ष घन मीटर, राज्याच्या फक्त ५.3%.

तापीचा उगम हा मध्य प्रदेश मधील मुल्ताई, किंवा मूळतापी इथला. आपल्याकडे नद्यांच्या मार्गांचे पण कोण कौतुक. नाशिक मधील पर्वतात जिथे गोदावरी दक्षिणेस वळते, त्या जागेला चक्रतीर्थ म्हणून पूजले जाते. तसेच जिथे तापीने पश्चिमेकडे निर्णायक वळण घेतले त्या जागेला सुर्यमुखी म्हणतात व तिथे देखील तापीची पूजा होते. बेतुल मधले वनवासी असे देखील मानतात की तापी आणि नर्मदा यांना पश्चिम वाहिनी केले ते कोणी माहितीये? Direct रावण आणि त्याचा भाऊ मेघनाद यांनी! बेतुल मधल्या आदिवासी पाड्यात आज देखील मेघनादाची भक्तिभावाने पूजा होते. रामायणाचे अनेक दुवे तापी किनारी येऊन थांबतात. असे मानले जाते की तापीच्या पात्रात श्रीरामाने १२ शिवलिंगांची स्थपना केली. खरेतर भारतातील अनेक नद्यात शिवलिंगे कोरली आहेत..शिव लिंगे आणि दगडी नदीपात्र हे समीकरणच आहे! तापीचे ज्ञानेश्वरांशी देखील घट्ट नाते आहे. चांगदेव तापी तीरावरचे. लहानग्या मुक्ताईने समाधी घेतली ती तापी काठच्या मेहूण येथे. तिचे पुरातन मंदिर मात्र हथनुर धरणात बुडाले…इथेच चांगदेव महाराजांचे देखील पुरातन मंदिर आहे…तापी पूर्णा संगमाच्या अगदी जवळ.

तापी आणि पूर्णा या जिवलग मैत्रिणी. तापी सूर्याची मुलगी, छाया तिची आई, तर पूर्णा किंवा पयोष्णी ही चंद्राची मुलगी! तापी कुरुवंशाची आद्यामाता. जिथे या दोन नद्या मिळतात ते एदलाबाद किंवा चांगदेव. गम्मत म्हणजे जिथे तापी आणि पूर्णा मिळतात, तिथे पूर्णेचे खोरे हे तापीपेक्षा कितीतरी मोठे आणि समृद्ध आहे, पण नाव पडले ते तापीचेच. चंद्रभागा आणि वाण या पूर्णेच्या महत्वाच्या उपनद्या. ( तापी देखील दोन आहेत, पूर्णा आणि चंद्रभागा देखील, त्यामुळे गोंधळण्याचे chances खूप आहेत :). तापी खोऱ्यातील नद्यांची नावे अद्भुत आहेत.. विश्वगंगा, निर्गुणा पासून अगदी भुकी, सुखी ते उतावली! दुसरी तापी थेट Thailand मध्ये आहे, आणि तिच्या तीरावर वसलेल्या शहराचे नाव देखील सुरत आहे!
तापीच्या महत्वाच्या उपनद्या म्हणजे पूर्णा, गिरणा, पांझरा, अरुणावती, गोमाई, बुरे, अनेर, सिपना आणि वाघुर. या सगळ्यांचे मिळून तापी खोरे ६५,००० वर्ग किमी एवढे प्रशस्त होते. तापी-पूर्णा मैतरणी विदर्भ आणि खान्देशला जोडणार्या दुवा आहेत.

तापी खोर्यात धरणांची रेलचेल आहे. 28 मोठे आणि मध्यम प्रकल्प या खोऱ्याला बंदिस्त करतात. महाराष्ट्रात यातील सगळ्यात जास्त प्रकल्प आहेत. तापी आणि पूर्णेच्या संगमाजवळच भुसावळ, जळगाव मध्ये हथनुर धरण आहे. याचा जरी काही केळी बागायतदारांना उपयोग होत असला तरीही यात जवळ पास ६०% गाळ साठल्यामुळे थोड्या पावसात देखील याचे backwater पूरग्रस्त होते, बागा पाण्याखाली जातात. येथेच महाकाय उपसा सिंचन योजना आहेत जसे लोवर तापी लिफ्ट इर्रीगेशन प्रोजेक्ट.. हे पर्यावरण मान्यता न मिळवता देखील सुरु झाले आहेत: बेकायदेशीरपणे.
पूर्व मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी लोवर तापी प्रकल्प आणि तापी सिंचन प्रकल्प यांच्या गुणवत्तेवर अतिशय गंभीर प्रश्न उभे केले होते. पण त्यावर काही कारवाई न होते पांढरेंचीच तिथून सोयीस्कर उचलबांगडी करण्यात आली.
पूर्णेवरचा अनेक वर्षे सुरु असलेला जिगाव प्रकल्प हा तर भ्रष्टाचाराचे प्रतीकच म्हणावे लागेल.

खानदेशमधला भूभाग हा महाराष्ट्राहून वेगळा: भूजल देखील वेगळे. समृद्ध गाळाच्या खोल, सकस जमिनी. येथे नाला खोलीकरण, रुंदीकरण केल्याचे उत्तम परिणाम आपण शिरपूरमध्ये बघितले. पण हेच logic बाकी महाराष्ट्राला आपण लावायला गेलो तर मात्र आपण आपले तुटपुंजे भूजल उघडे पाडतो. इथेच एक महा भूजल पुनर्भरण कार्यक्रम गेली अनेक वर्षे प्रस्तवित आहे. पण त्याबद्दल स्पष्टता मात्र कुणालाच नाही.
नदी जोड प्रकल्पांतर्गतची महत्वाची लिंक म्हणजे पार-तापी-नर्मदा लिंक. याद्वारे महाराष्ट्रातील पार, नार, औरंगा इत्यादी नद्यांचे 22 TMC पाणी तापीत सोडून ते गुजरातला थेट कच्छ आणि सौराष्ट्रात न्यायचे आहे. महाराष्ट्राला मात्र हे पाणी गिरणा नदीत सोडून ते मराठवाड्यात न्यायचे आहे. दोन्ही plan एकसारखेच अव्यवहार्य, खर्चिक आणि पर्यावरण दृष्ट्या हानिकारक.. गम्मत म्हणजे केन बेटवा, पार-तापी-नर्मदा आणि दमणगंगा-पिंजाळ या देशातील सगळ्यात महत्वाकांक्षी लिंक्स. पण केन-बेटवा सोडता दोन राज्यांमधील वादामुळे या पुढे जात नाहीत.
तापी खोऱ्यात आणि पांझरा नदीत अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे अनन्वित वाळू उपशाचा. अनेक कार्यकर्ते इथे अथक प्रयत्न करत आहेत, पण वाळू माफियाची पोहोच वर पर्यंत असल्यामुळे तापी खणलीच जात आहे.

महाराष्ट्रातून पुढे तापी गुजरातेत शिरते. सुरत शहर तापी किनारी वसले आहे. आपल्या पैकी काहींना 2006 ऑगस्ट मधील सुरतचा विनाशकारी पूर आठवत असेल. यात १२० माणसे आणि हजारो पशु मृत्युमुखी पडले. यामागचे मुख्य कारण होते 80 किमी upstream वरच्या उकाई धरणात पोट फुटे पर्यंत पाणी भरून ठेवणे आणि महाराष्ट्रातील तापी खोऱ्यात अविरत पाउस पडत असूनही ते न सोडणे. याचा परिणाम ह्व्याचा तोच झाला. भरतीच्याच वेळी उकाई धरणाचे २१ दरवाजे अचानक उघडावे लागले आणि तापीने सुरत जवळपास गिळंकृत केले. या कथा आपल्याकडे नव्या नाहीत. देशभर: गंगेवरील फराका धरण असो, महानदी वरील हिराकूड असो, कृष्णेवरील अलमट्टी असो, या धरणगाथा आहेतच. असो.
पुढे हाजिरा जवळ तापी छोटा त्रिभुज प्रदेश बनवून खंबाटच्या आखातात विलीन होते. नर्मदा देखील येथेच समुद्रास मिळते. इथे एक महाकाय कल्प्सार प्रकल्प उभा करायचा आपल्या प्रधानमंत्र्यांचा बेत होता. पण कल्प्सार हे ‘काल्पनिक सरोवरच ‘ राहिले. आणि तेच योग्य. याला अनेक कारणे आहेत, त्याबद्दल परत कधीतरी 🙂
जिथे तापी समुद्रास मिळते तिथे मात्र हे सौंदर्यवती, सामर्थ्यशील नदी अगदी गटार होते. मासे इथे अनेक वेळा मरतात, अख्ख्या सुरतचे मैलापाणी ती ओटीत आणते.. तिच्या समृद्धीच्या खुणा दूर राहतात…तापी माँ, सूर्यपुत्री, श्लोक, स्तोत्र, वगैरे लांब राहतात. इथे ती स्वतःचा प्रवाह आटलेली, बारीक, मैलापाणी नेणारी एक धारा असते…
परिणीता दांडेकर, SANDRP
parineeta.dandekar@gmail.com
~~
तुम्ही तापी खोऱ्यात, पूर्णा किंवा गिरणा खोऱ्यात राहता का? तुमच्याकडे या नद्यांबद्दल, इथल्या प्रकल्पांबद्दल अधिक माहिती/कथा/गोष्टी असतील, तर इथे जरूर शेयर करा 🙂
या तुमच्या आगामी नदी परिचयाच्या मालिकेबद्दल कुतूहल आहे. तुमच्या पद्धतीने ( नदीशी संबंधित भोगोलिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय समस्यांसह ) हा परिचय माहितीपूर्ण व उद्बोधक होतो. आता पुढचा लेख ? आम्ही ( चंद्रकला कुलकर्णी व मी ) आमच्या ” गंगे तुझ्या तीराला ‘ ( राजहंस प्रकाशन )या पुस्तकात गंगा व तिच्या उपनद्यांवर थोडेफार याच पद्धतीने लेखन केलेले आहे. ते पुस्तक
तुमच्या पाहण्यात आले का ?
LikeLike
धन्यवाद सर, तुमच्या प्रतिक्रिया नेहमीच खूप काही देतात. मी अजून पुस्तक वाचले नाही, पण त्याबद्दल ऐकले आहे. आता वाचणार 🙂
LikeLike
परिणीता, अतिशय उत्कृष्ट, माहितीपूर्ण मालिका आहे आणि तुमची शैली नदीच्या प्रवाहासारखीच ओघवती आहे. पाण्यासारख्या महत्वाच्या नैसर्गिक संसाधनांबद्दल साक्षरता निर्माण होणे फार गरजेचे आहे, त्यामुळे तुमच्या लेखनाबद्दल अनेक आभार, वाचते आहे.
LikeLike
धन्यवाद शिल्पा 🙂
LikeLike
Thak you for such worth reading information about rivers
LikeLike
thank you 🙂
LikeLike
पुढच्या लेखाची वाट पाहते.. तुम्ही नदीला जे character देता, त्यामुळे तिचा इतिहास, भूगोल ही तिची गोष्ट होऊन जाते. अतिशय वाचनीय स्टाईल..
LikeLike
चला आता वर्षभरात एक उत्तम, अभिजात लेखन नदीवर वाचायला मिळणार याचा आनंद तुमचे लिखाण खळाळो
LikeLike
तुम्ही खूप छान लिहल आहे…. असंच लिहा मॅडम……👍👍
LikeLike