सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नद्यांचे माहेरघर आहेत. येथून दोन प्रकारच्या नद्या उगम पावतात: दक्षिण वाहिनी: ज्या विस्तीर्ण, महराष्ट्रापल्याड जाणार्या आहेत, आणि पश्चिम वाहिनी नद्या, ज्या तशा छोट्या, सुबक आणि ओघवत्या आहेत. मोठ्या दक्षिणवाहिनी नद्यांमध्ये आहेत गोदावरी (आमची नदी, मी नाशिकची.), भीमा, कृष्णा आणि कोयना. पश्चिमवाहिनी नद्या अनेक आहेत, जसे की दमणगंगा (गुजरातेत जाणारी, कदाचीत नदीजोड प्रकल्पात भरडून निघणारी), काळू ,शाई (यांवर मुंबईसाठी मोठी धरणे नियोजित आहेत) उल्हास, वैतरणा (मुंबईला पाणीपुरवठा करणार्या), सावित्री (महाडचे रासायनिक प्रदूषण रीचवणारी), वशिष्ठी, (कोयनेचे/दुष्काळी भागाचे पाणी न मागताच आपल्या ओटीत सामावणारी, व नंतर लोटे परशुरामच्या रासायनिक प्रदूषणाने आपले मासे, जीवसृष्टी गमावणारी) शास्त्री (महराष्ट्रातील कदाचित एकमेव मुक्तवाहिनी नदी!), कर्ली (तळकोकणातला हिरा!) इत्यादी.


नर्मदा, पूर्णा आणि तापी या अगदी वेगळ्या नद्या, सातपुड्यात उगम पाऊन खानदेशातून पश्चिमेकडे, गुजरातकडे वाहणार्या. विस्तीर्ण नद्यांच्या रेलचेलीमुळे आणि राजकीय समीकरणामुळे पश्चिम महराष्ट्रात सुबत्ता नांदली. या विरुद्ध मराठवाडा. पाऊसमान अगदी कमी नसूनही, भूभागाच्या संरचनेमुळे मोठ्या नद्या इथे उगम पावत नाहीत. तरी देखील येथील दुधना, शिवणा, सीनेचा काही भाग, सिंधफणा, वेळगंगा या नद्या महत्वाच्या. या सगळ्या गोदावरीच्या बहिणी. मराठवाड्यातील अगदी छोटा भाग कृष्णा खोर्यात मोडतो, पण तेथीही पाणी कमीच. मराठवाड्यात परतीचा पाउस पडतो, एवढाच काय तो दिलासा. पुढे विदर्भात गेल्यावर मात्र गोदावरीचे वैभव पुनर्स्थापित होते. पेनगंगा, वैनगंगा (वनगंगा: किप्लिंगच्या जंगलबुकमधल्या मोगलीची नदी!) या जंगलातून वाहणार्या समृद्ध नद्या आपले पाणी गोदावरीला देतात आणि तेलान्गाण्यात शिरण्याआधी हीच का ती मराठवाड्यातील कोरडी गोदावरी असा प्रश्न पडतो. विदर्भात गोंड राजांनी बांधलेले मालगुजारि तलाव हे देखील खासच. हजारोंच्या वर हे तलाव भूजल पुनर्भरण करतात, पावसाचे पाणी साठवतात, मासे आणि पक्ष्यांना, वन्य पशूंना आणि धानाला पाणी पुरवतात! सारस पक्ष्यांची जोडी बघावी तर भंडार्यात!

कृष्णामाई महाबळेश्वर येथे उगम पावते, ४ मैत्रिणीन सोबत: कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा. यातील कोयनाच काय ती कृष्णेला थोडी सोबत करते, गायत्री आणि वेण्णा लगेचच कृष्णेला मिळतात तर सावित्री थेट कोकणात उतरते. अशी कथा आहे की सावित्रीनेच त्रिमुर्तीला शाप देऊन त्यांना नदी बनविले..कृष्णा म्हणजे विष्णूच..आता शिळा होण्याचा शाप मी समजू शकते, पण विस्तीर्ण प्रवास करणारी नदी होणे मस्त असेल की! आज मात्र पश्चिम महाराष्ट्रातील नदी असणे हा शापच असेल. कोयना सगळ्यात दुर्दैवी. उगमापासून काही अंतरावरच तिच्यावर कोयना धरण बांधले गेले आहे जे कोयनेचे पाणी वळवून कोकणात, वशिष्ठी मध्ये ओतते.

कृष्णामाई सांगली, सातारा, कोल्हापूर यांचा कायापालट करत कर्नाटकात जाते जिथे तिला भीमाशंकरला उगम पावलेली भीमा, व पश्चिम घाटातच उगम पावलेली तुंगभद्रा भेटतात. पुढे आंध्र प्रदेशात गोदावरी आणि कृष्णा, ज्या महाराष्ट्रात सुरक्षित अन्तर राखून वाहत होत्या, त्या एकत्र गोदावरी–कृष्णा असा (एकेकाळी) सुपीक गाळाचा मुखप्रदेश (delta) बनावितात.

कोकणात वाहणार्या आणि अरबी समुद्राला मिळणार्या नद्या हा एक सुंदर विषय आहे. या नद्या वेगाने धावणार्या, कधी पूर्णपणे भरलेल्या, तर कधी कोरड्याठक्क आहेत. इथे वृक्षराजी भरपूर आणि नद्यांना वेढणार्या कथांची रेलचेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील नद्यांच्या येव्यापैकी ( एकूण वर्षभरात मिळणारे पाणी) ४५% येवा हा कोकणातील नद्यांचा आहे. पण तरीही कोकणी शेतीची, कोकणातील माणसाची भिस्त ही भूजलावर जास्त. भूजल कोकणात विविध रूपे घेऊन संचारते: कधी ते उम्बराचे पाणी असते, कधी बाव असते, कधी तो दोण असतो, कधी छोटी साठवण विहीर असते, तर कधी बांधलेला, मन्दिराकाठचा सुंदर तलाव असतो.

थोडक्यात म्हणजे महाराष्ट्र हा नद्यांनी आणि विहिरींनी समृद्ध असा भूभाग आहे: basalt खडकाच्या साठवण मर्यादा असूनही. आपली प्रमुख खोरी पाच: गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा ( अगदी थोडा भाग) आणि पश्चिम वाहिनी नद्या. एकट्या पर्जन्यामानावार पाण्याची उपलब्धता आपण ठरवू शकत नाही. कोकणात १२०० मिमी वर पाउस पडतो तरीदेखील तिथे अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असते, तर पुण्यात ७०० मिमी पाऊस असूनही पाणीच पाणी आहे.
महाराष्ट्रात भारतातील सगळ्यात जास्त मोठी धरणे आहेत. १८०० च्या वर. दुसर्या क्रमांकावर असलेल्या मध्यप्रदेश पेक्षा दुप्पटीने जास्त. असे असूनही आपल्याकडेच देशातील लागवडी खालचे सगळ्यात कमी क्षेत्र सिंचित आहे, जेमतेम १८%. मोठी धरणे= अधिक सिंचन इतके सहज गणित महराष्ट्रात नाही (भारतातही नाही). याला कारणे अनेक आहे, आपण येत्या दिवसात त्यांकडे बघू. असे असताना आपली खरी भिस्त आहे भूजलावर आणि आपल्या छोट्या-मोठ्या नद्यांवर. जवळ जवळ ७१% लागवडीखालील भाग हा विहिरींनी/बोरनी सिंचित आहे. आणि गम्मत अशी आहे की आपण धरण घोटाळ्यात हजारो कोटी रुपये गमावतो, अजून महत्वाकांक्षी धरणे बांधतो, रोज धरण पातळ्यांची obsessively चाचपणी करतो, पण आपले भूजल अजूनही पूर्णपणे unregulated आहे. आपले समीकरण सोपे आहे, ज्याची जमीन, त्याचे पाणी. याचे परिणाम अत्यंत घातक आहेत. पण तरीही आपली सगळी व्यवस्थापना ही धरणांभवतीच पिंगा घालीत असते. भूजल आणि नद्याना आपण फारसे स्थान देत नाही. त्यात पैसा नाही. पावरही नाही.
तर, दुष्काळग्रस्त गावे, पैसेवारी वगैरे मध्ये जाण्या आधी हे बघणे अटळ आहे की आपल्या जीवनरेखा: जमिनीवरच्या आणि जमिनीखालच्या, काय अवस्थेत आहेत. फक्त मोठी धरणे बांधून, सामान्य माणसाच्या कराचे हजारो कोटी रुपये खर्चून, वर्षानुवर्षे इकडचे पाणी तिकडे सोडायच्या बाता मारून, महाकाय कालवे अर्धे सोडून किंवा राक्षसी पद्धतीने नद्यांचे आणि नाल्यांचे खोलीकरण/रुंदीकरण करून आपण शाश्वत पाण्याचे स्रोत आणि असलेले पाणी योग्य पद्धतीने वापरायचा विवेक आत्मसात केला नाही. अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास कामे होवूनही जर तिथे पाणी टंचाई भेडसावत आहे, तर त्याची उत्तरे खोल आहेत.

आपल्या नद्यांना, विहिरींना आपण पावित्र्य बहाल केले आहे. जवळ जवळ प्रत्येक नदीच्या उगमाशी, संगमाशी शिवमंदिर आहे, देवराया आहेत. पवित्र डोह आहेत, पवित्र विहिरी आहेत. ते सगळे सोडून पाणी म्हणजे मोठी धरणे हे समीकरण रूढ झाले आहे. धरणगाथेने आपल्या शहरांना पाणी दिले, शिवारात उस पिकवला, औद्योगिकीकरणाला चालना दिली. पण उस गोड लागला म्हणून मुळापासून खात नाहीत (सध्या जमीनही क्षारपड, उसही जळालेला आणि कीटकनाशकेही फार!). या घडीला महाराष्ट्रात भारतातील सगळ्यात जास्त पाण्याशी निगडीत वाद आहेत. आणि हे वाद unregulated धरणांच्या भवती रेंगाळत आहेत. आपल्या अस्मिता बदलेल्या आहेत व प्रादेशिक अस्मिता धरणांभोवती फिरत आहेत.. जेव्हा आपल्या नद्या आणि भूजल खंगत चालले आहे. आता हेच बघा: मराठवाड्यातील जायकवाडी धरणास पाणी सोडण्यास अहमदनगरने विरोध केला: म्हणजे कोणी तर तिथल्या राजकीय साखर कारखान्यांनी. धरणांची जीवनरेखा नदी आहे आणि शेतीची जीवनरेखा बहुतांशी भूजल आहे, आपली आणि यांची सोयरिक देखील जुनीच आहे!
~परिणीता दांडेकर, parineeta.dandekar@gmail.com
Very well written article. From me lots of learning. It should be circulated & need to take action.
LikeLike
Thanks a lot Sir
Parineeta
LikeLike
अशी लेखनमाला वाचनात आली ह्याचा आनंद झाला आणि त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
Basalt खडक हा मर्यादित/कमी पाणी साठवितो असे तुम्ही लेखात नमूद केले आहे. मी ह्यावर सोपे विश्लेषण असलेले दुवे शोधायचा प्रयत्न केला पण बहुधा सर्वच दुवे कोणत्यातरी शास्त्रीय प्रयोगाचे सार प्रस्तुत करीत होते. थोडी अधिक आणि सोपी माहिती मिळाल्यास आभारी असेन 🙂
LikeLike
Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही and commented:
सुंदर लेख
LikeLike
Simply great!!Hats off!! No words!!Keep it up!!Wish you a very happy and prpsporous new year
LikeLike
आपले नदीबद्दलचे लेखन साहित्य नेहमीच सुंदर असते, आपल्या नद्यांच्या अभ्यासाबाबत नेहमीच कुतूहल आहे, पवनामाईच्या बाबतीत मात्र आम्ही नेहमी चातकासारखी आपली वाट पाहत असतो ..आपण याला आणि आम्हाला आमच्या पवनामाईबद्दल सांगाल ..तिचा काठ, तिचा प्रवाह, तिच्यातील जैवविविधता आणि बरच काही ..!
तो क्षण आमच्या साठी खूप आनंदाचा असेल जेंव्हा परिणीता नावाची नदी पवना नदीला भेटेल ..
सचिन काळभोर
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी
LikeLike
अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏 पण जागतिक पर्यावरण बदल यामुळे आपण सध्या बोनस टाईम वर जीवन जगत आहे आपण एक मुल एक झाड नव्हे तर एक मुल दोन झाडं लावली पाहिजेत
LikeLike