तुझे नाव काय गं सये?

बियास आणि सतलज या नद्यांमधला ‘दोआब’ हा भाग अत्यंत सुपीक आणि सुंदर. मी नद्यांचा अभ्यास करते. त्यादिवशी मी नद्यांवरील परिवहन प्रकल्पाबद्दल वाचत होते. त्यात या नद्यांवरील प्रकल्पाचा होणारा पर्यावरणीय परिणाम अभ्यासाला गेला होता. वा, परिवहन प्रकल्पांचा वेगळा EIA (Environmental Impact Assessment) ? नवीन आणि चांगली गोष्ट आहे की, हे कधी झाले, मी मनात म्हटले. या अभ्यासाचे मुख्य कार्यालय हाँगकाँग असणार आहे.

हाँगकाँग? मी परत वाचले. बियास आणि सतलजचा अभ्यास हाँगकाँगमध्ये बसून करणार? काहीतरीच.

पण काहीतरी चुकलेच होते. नकाशावरील नद्या अगदी नाजूक, छोट्याश्या दिसत होत्या. आपल्या पंजाबच्या बियास आणि सतलज या खानदानी नद्या. विस्तीर्ण गाळाची पात्रे, सुरेख तट. संस्कृती घडविणा-या या नद्या पंजाबमध्ये इतक्या नाजूक नक्कीच नाहीत. परत नीट बघितले. मी वाचत असलेला अहवाल हाँगकाँग सरकारचा होता आणि या सतलज, बियास अणि हो, झेलमसुद्धा! या नद्या भारतातील नाही, तर हाँगकाँगमधील होत्या!

अंदाजे १८६० मध्ये अनेक पंजाबी सरदारांना ब्रिटिशांनी हाँगकाँगच्या पोलिसदलात रवाना केले होते. अनोळखी प्रांतात या नवख्या, काहीशा भांबावलेल्या प्रवाशांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या लाडक्या नद्यापण नेल्या होत्या तर !

विलक्षण असले तरी हे दुर्मीळ नाही. आपल्याकडे कितीतरी नद्यांची नावे सारखी आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या नद्यांची नावे सारखी आहेत.. या नावांमागे काही समान दुवा आहे का? भारतात किंवा जगामध्ये, नद्या फक्त पाणी पुरवठा करणा-या कधीच नव्ह्त्या. त्यांच्याभोवती त्या भागाचा इतिहास, भूगोल, अर्थकारण, दंतकथा, रूपके माळली गेली होती.

जसे की सतलजचेच बघा ना. काकासाहेब कालेलकर आपल्या ‘जीवनलीले’मध्ये म्हणतात की, सतलजचे संस्कृत नाव होते ‘शतद्रू’ : शंभर वाटांनी वाहणारा नद .

नर नद्या किंवा नद आपल्यासाठी नवे नाहीत. ब्रह्मदेवाच्या पुत्रापासून, केण, शोण (सोनभद्र), भीम, असे अनेक नद आपल्या ओळखीचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये गंगा जिथे आपल्या मुक्त वेणीचा विस्तार करून अनेकविध वाटांनी समुद्रास मिळते तिथे तर अनेक नद आढळतात: रूपनारायण, दामोदर, अजोय, पगला, गोदाधारी, बराकेश्वर, भैरब असे कितीतरी. त्यातले काही नद बांगलादेशात शिरतात. तिथे देखील जशी मोधुमती आहे, तसाच ‘कुमार’ सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर माथाभांगा देखील! (महाराष्ट्रातही डोईफोडी आहेच की !)

एवढे नद या एकाच परिसरात का? मी तेथील अभ्यासकांना विचारले असता एक विलक्षण कारण दिसले. नद्या खरेतर सहृदयी, पोषणकर्त्या माता. पण या भागात इतके विनाशकारी, विध्वंसक पूर येतात की क्षणात होत्याचे नव्हते होते. या उघड्या सामर्थ्यापुढे कदाचित प्रेममयी मातेची प्रतिमा मागे पडली आणि त्याची जागा घेतली ‘ब्रह्मपुत्र’ आणि ‘गोदाधारी’ यांनी..

ज्या सिंधू नदीपासून भारतवर्षाला ‘हिंदोस्तान’ नाव मिळाले तिचा उगम तिबेटमध्ये होतो. तिथे तिचे नाव आहे ‘सेंगे झान्ग्मो’, म्हणजे सिंह नद. नदी नाही. नंतर लडाखमध्ये देखील तिला सिंगे छू (छू म्हणजे नदी) म्हणतात. पुढे अफगाणिस्तानात पाश्तो भाषेत तर सिंधू बनते ‘अबासीन’: पिता नद.

नद-नदी हा भेद संस्कृत नामातच आढळते असे नाही. या उलट बोलीभाषेतील, आद्यभाषांतील नावे नद /नदबद्दल खूप काही सांगून जातात. अभिजात संस्कृत नावे ऐकायला मधुर वाटली, तरी खूप वेळेस नदीच्या मूळ स्वभावापासून थोडी अलिप्त असतात. बोलीभाषेचे तसे नसते. कर्नाटकात अतिशय मधुर नावाच्या नद्या आहेत: सौपार्णिका, नेत्रावती, पयस्विनि, सुवर्णा, अघनाशिनी, शाल्मला इत्यादी, पण ही नवे त्या नद्यांबद्दल फारसे काही बोलत नाहीत.

सुंदर शाल्मला आणि तिच्यातील शिवलिंगे फोटो: परिणीता
सुंदर शाल्मला आणि तिच्यातील शिवलिंगे फोटो: परिणीता

या उलट बोलीभाषेतील नावांचे आणि कथांचे असते. फार देव-देवतांचे लटांबर नसते सहसा या कथांमध्ये: नद्या अगदी खऱ्या स्त्रीसारख्या, माणसासारख्या समोर येतात: कधी चिडलेल्या, कधी कृपाळू, तर कधी द्विधा मनस्थितीत असलेल्या. नर्मदा एकसूरी, सदा आशीर्वच प्रेमळ नदी नाही, तर सोनभद्राला ( शोण नद) चिडून लाथाडणारी स्वाभिमानी प्रेमिका देखील आहे.

sahasradhara
महेश्वर येथील नर्मदा..मा रेवा फोटो: परिणीता

सिक्कीममध्ये एक दंतकथा आहे. तिस्ता नदी आणि रोंगीत (नद) यांचे प्रेम होते व त्यांना संगमापूर्वी पवित्र कांचनझोन्गा पर्वताचे आशीर्वाद घ्यायचे होते. तिस्ता आणि रोंगीत यांचा उगम हिमालयातला. तिथल्या घनदाट राईतून या नद्या आपापले मार्ग आक्रमत अधीरपणे कांचनझोन्गाच्या दिशेने धावू लागल्या. सिक्कीम अजूनही भारतातील सगळ्यात जास्त जैवविविधता असलेले राज्य आहे. नद्यांनी अनुरूप वाटाडे स्वीकारले: तिस्तेचा वाटाड्या होता एक सर्प, तर रोंगीतचा होता एक पक्षी. सर्प आपल्या स्वभावानुरूप नागमोडी वळणे घेत, तब्येतीने पोचला, तिस्तेबरोबर. तिस्तापण सर्पामागे घुमटदार वळणे घेत घेत आली. पक्षी मात्र भारी चंचल. कुठे आकाशात झेप घेई, तर कधी क्षणार्धात अदृश्य होई, त्याच्या मागे धावता धावता रोंगीत बिचारा कधी थांबायचा, तर कधी ठेचकाळून दगड्गोट्यातून त्याचा चक्क धबधबा व्हायचा, असे करत करत रोंगीत कांचनझोन्गाच्या पायाशी पोचला, तर तिस्ता तेथे हजर.

रोंगीत वैतागला. तिस्तेला बघून त्याने आपली वाटच बदलली. तिस्तेने खूप आर्जवे केली, नदाचा ‘अहंकार’ न दुखावण्यासाठी त्याला समजावले, “चूक तर वाटाड्याची होती, नाहीतर तू तर माझ्या आधीच पोचला असतास”. सरतेशेवटी रोंगीत बधला आणि त्यांचा संगम झाला. सिक्कीमच्या कित्येक लोककथांमध्ये ,लोकगीतांमध्ये आजही तिस्ता आणि रोंगीत आपल्याला भेटतात. खरे तिस्ता आणि रोंगीत मात्र आज अनेकविध धरणांचे बंदी झाले आहेत. तिस्ता तर कैदीच झाली आहे. जेव्हा तिस्ता बांगलादेशात शिरते, तेव्हा तिच्यात मासे जगाविण्यापुरते पाणी देखील शिल्लक नसते. सिक्कीमची तर जलविद्युत प्रकल्पांनी, त्यांच्या भुयारांनी चाळणच केली आहे. तेथील लोक धरण कंपन्यांना ‘डोंगर कुरतडणा-या घुशी’ असे म्हणतात.

तशीच काहीशी गोष्ट आहे चंद्राची मुलगी चंद्रा आणि सूर्यपुत्र भागा यांची. हिमाचल प्रदेशमधील हिमालयात ते देखील असाच पण करतात की, वाहात वाहात एका पवित्र सरोवराजवळ भेटायचे व लग्न करायचे. येथे देखील चंद्रा आधी पोचते, आणि तिचे काम होऊन बसते भागाची समजूत काढणे. पण शेवटी चंद्रभागा एकत्र वाहतेच. ही चंद्रभागा म्हणजे पुढे आपली चेनाब. या चेनाबवर देखील आपण हिमाचल व काश्मीर मध्ये ४७ जलविद्युत बांध बांधतो आहोत, दोन धरणांमधील अंतर शून्य. म्हणजे नदी एका जलाशयातून भुयारात आणि भुयारातून दुसऱ्या जलाशयात जाणार फक्त. वाहणे वगैरे उगीच उर्जेचा अपव्यय…

पण चंद्रभागा तरी ही एकच का? मला आपल्याच देशातील ५ चंद्रभागा माहित आहेत, म्हणजे त्याहून जास्त देखील असतील. एक चंद्रभागा मराठी जनांच्या मनातील पंढरपूरातले विस्तीर्ण वाळवंट बनवणारी, तर एक आहे गुजरातेत अहमदाबादजवळ वाहणारी, एक बंगालमध्ये बीरभूमजवळ, एक ओडिशात सूर्य मंदिराजवळ, तर एक आहे बिहारमध्ये. या नावाचा नदीच्या चंद्रकोरीप्रमाणे झोकात वळण घेण्याशीही संबंध आहेच!

जशी ओडिशामध्ये विस्तीर्ण वैतरणी आहे, तशी महाराष्ट्रात गोदावरीच्या अगदी जवळ उगम पावणारी वैतरणा आहे. या नद्यांना मात्र वैभवशाली इतिहास नाही. गरूडपुराणात वैतरणी म्हणजे या आणि पल्याडच्या जगाच्या सीमेवर वाहणारी, रक्तभरित नदी . गंमत आहे, पश्चिम घाटात नाशिकजवळ गोदावरी आणि वैतरणा यांचा उगम अगदी काही किलोमीटर वरचा: पण वैतरणा वाहात गेली घाट उतरून, मुंबईच्या दिशेने, उणीपुरी १६०-२०० किमी, तर गोदावरीची ही फक्त सुरूवात आहे. गोदावरी पुढे हजारो किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांची विशाल जीवनदायिनी होते.

आणि जशी आपली गोदावरी, तशीच नेपाळमध्येही एक गोदावरी वाहते !

रावीचे पुरातन नाव ‘इरावती’ असले तरी म्यानमारमधून वाहणारी आणि नंतर अंदमान समुद्राला मिळणारी इरावती (इरावड्डी) वेगळी आहेच. बंगाल्यांना त्यांचे लाडके इलीश (हिल्सा) मासे सध्या या इरावतीतून मिळतात कारण या विलक्षण चव असलेल्या माशाच्या स्थलांतराची वाटच आपण गंगेवर ‘फराक्का’ नामक राक्षसी बांध घालून बंद केली आहे.

यमुना देखील अनेक आहेत,पण प्रत्येक यमुनेमागे एक समान धागा आहे. यमुना नदी ही यमाची, मृत्युदेवतेची बहिण. प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ के. एस. वाल्डियांच्या अभ्यासाप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी प्राचीन सरस्वतीचे पाणी चंबल (चार्मावती) तून एक छोट्या वाहिनीने गंगेत मिळाले, इथे सुरु झाला सरस्वतीचा अंत. या वाहिनीचे नाव होते यमुना. आसाममध्ये धनसिरी नदीने कोपिल्ली (कपिलि) नदीचे पाणी ‘चोरले’ आणि त्या चोर वाहिनीचे नाव आहे यमुना. पूर्वी ब्रह्मपुत्र सागराला मेघनेतून, मेघनेबरोबर मिळायचा, गंगेबरोबर नव्हे, पण एक वाहिनी निर्माण झाली, ब्रह्मपुत्रा आणि गंगेला जोडणारी, आणि तिचे नाव देखील होते यमुनाच!

कावेरी पण अशाच दोन. एक कावेरी पश्चिम घाटाच्या कुशीत जन्मणारी, तर एक ओंकारेश्वराजवळ नर्मदेला मिळणारी!

पण जशी माझी मैत्रीण सायली दातार म्हणते (सायली Indologist आणि Ecologist यांचे एक भन्नाट मिश्रण आहे), ही नावे अभिजात संस्कृत नावे आहेत: आलंकारिक, कालिदासाच्या काव्यासारखी किंवा त्याच्या अभिसारिकांसारखी. वैदिक हिंदू संस्कृतीची पकड या नावांवर फारच घट्ट आहे.

वनवासी समूहांची किंवा अगदी आपल्या बोलीभाषेतील नावे नदीच्या स्वभावाच्या जरा जवळ जाणारी: जशी नाशिकची ‘वाघाडी’, जी पुरात वाघासारखी झडप घालते, किंवा कोकणातील ‘गडगडी’ जी पाण्याबरोबर पर्वतातून मोठे शीलाखंडदेखील वाहवत आणते: गडगडत! किंवा ठाण्याजवळची ‘सैतानी’: जी पुरात अगदी वेडीपिशी होते, किंवा घोड्यासारखी दौडणारी ‘घोड’ किंवा गुजरातमधील कोरडी ‘भूखी’ आणि वेगाने वाहणारी ‘उतावली’!

पूर्वांचलातील नद्यांची नावे त्या भागा प्रमाणेच वैविध्याने नटलेली आहेत.एकट्या अरुणाचल प्रदेशातच १०० च्या वर आदिवासीगट आहेत आणि जवळ जवळ प्रत्येक गटाची आपली अशी भाषा आहे. अरुणाचालातून दिबांग, सियांग आणि लोहित मिळून आसाम मध्ये महाकाय ब्रह्मपुत्र तयार होतो. आसामचे एक पुरातन नाव आहे लौहित्यप्रदेश, लौहीत ( बोडो भाषेत नाजूक असे लुइत) नदीचा प्रदेश. लोहितचा हा संदर्भ महाभारतातील भीष्म पर्वातही सापडतो . लोहित हि ब्रह्म्पुत्रेची उपनदी, पण असे मानले जाते कि लोहीतच्या तुलनेने ब्रम्हपुत्र हे नाव तसे नवेच. परशुरामांनी मातृहत्या केलेली ती भीषण कुऱ्हाड ब्रह्म्कुंडात बुडविली आणि त्याचे पाणी रक्तासम लाल झाले…यातून लाल ‘लोहित’ नावाचा उगम झाला. पण असेही मानले जाते की बोडो ‘लुइत’ याचाच sanskritised form म्हणजे लोहित.

परशुराम कुंड आणि अभूतपूर्व लोहित फोटो: परिणीता
परशुराम कुंड आणि अभूतपूर्व लोहित फोटो: परिणीता

बोडो भाषेत दी किंवा ती म्हणजे नदी. त्यामुळे इथे दिबांग, दिहिंग, दिक्रोंग अशा नावांची रेलचेल आहे. दि-बांग म्हणजे नाद्णारे पाणी!
या अरुणाचल प्रदेशात १६० हून अधिक जलविद्युत प्रकल्प planned आहेत. यातील सगळ्यात मोठे प्रकल्प हे याच दिबांग, लोहित आणि सियांग नद्यांवर होणार आहेत. सियांग वर ४५, लोहित वर १२ च्या वर तर दिबांग वर २०च्या वर महाकाय: भारतातील सगळ्यात मोठे जलविद्युत प्रकल्प. हे प्रकल्प या नद्यांना, इथल्या जंगलाना, छोट्या आदिवासी गटांना पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे नद्यांच्या वाह्ण्यावर:त्यांच्या hydrology वर. सियांग नदी दिवसात ५०० cumec पासून जवळ जवळ ६००० cumec (क्युबिक मीटर प्रती सेकंड ) पर्यंत वाहणार . रोज . रोज नदीत असेल हिवाळ्यातील सगळ्यात कमी पाणी आणि थोड्याच वेळात रोरवता प्रलयकाली पूरही! (जेव्हा विद्युत निर्मिती साठी पाणि सोडण्यात येईल). एका दिवसांत नदीची पाणि पातळी २४ फुटाने खालीवर होणार. ही अशी fluctuationsजैवविविधतेसाठी साठी अत्यंत घातक, नव्हे पूर्णपणे मारक असतात. पण ते सारे असो. आपल्याला सध्या लोकसंस्कृती, जैवविविधता, पर्यावरण वगैरे गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मग नद्या, त्यांच्या नावांच्या अनवट वाटा, त्यांच्वर आधारलेल्या छोट्या गोष्टी, गाणी, कविता या तर क्षुल्लक गोष्टी झाल्या.

पण नदी जशी ‘प्राणहिता’ आहे, तशी ती ‘कीर्तीनाशा’ देखील आहे. कीर्तीनाशा वाहते बांगलादेशात, गंगेचीच उपनदी जिने समृद्ध सोनपूर भागाला सोळाव्या शतकात आपल्या कवेत घेतले, समृद्धीचे, कीर्तीचे निशाण साफ पुसून काढत.

गंगेला कसे विसरणार? भारतभर गंगा हे नाव तर नदी ऐवजीच वापरले जाते.

पण गंगा या नावाचा शब्दशः अर्थ होतो ‘ती जी वाहते’ ‘गं गच्छति’.

वाहणे हा तर नदीचा धर्म आहे, तिची ओळख आहे ,पण सध्या आपण गंगेवर, ब्रह्मपुत्रेवर, हिमालयातील आणि पश्चिम घाटातील नद्यांवर ज्या वेगाने धरणे बांधून नद्यांचे अस्तित्व पुसत आहोत, वाटते की ‘अमृतवाहिनी’ सारखीच गंगा, म्हणजे ‘वाहणारी’ हे देखील एखाद्या दंतकथेचा भाग होईल!

~ परिणीता दांडेकर, parineeta.dandekar@gmail.com 

(डिजिटल वर्षा आणि आंदोलन मध्ये पूर्व प्रकाशित )

4 thoughts on “तुझे नाव काय गं सये?

  1. हे चराचर, निसर्ग वाचन माणूसपण घडवतं.
    लेख वाचतानाही एक अनाहत नाद मनात उमटत राहिला.

    Like

Leave a comment